चंदनझिरा पोलिसांची कारवाई; दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांकडून चार धारदार तलवारी जप्त
अल्पवयीन बालकांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल; पालकांनी मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांचे आवाहन
जालना/प्रतिनिधी/ जालना शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या अनुषंगाने चंदनझिरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांकडून चार धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या असून, याप्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या तलवारींची अंदाजे किंमत १० हजार रुपये आहे.
दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी दैनंदिन कामकाज करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत दोन इसम पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये धारदार तलवारी घेऊन इंद्रप्रस्थ चौक, चंदनझिरा येथून महात्मा फुले चौकाच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने महात्मा फुले चौक परिसरात सापळा रचला.
सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास संशयित दोघे गोणी घेऊन येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस पथकाने तत्परतेने दोघांना गोणीसह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघेही अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. गोणीची तपासणी केली असता त्यामध्ये तीन लोखंडी धारदार तलवारी व एक स्टीलची धारदार तलवार अशा एकूण चार तलवारी आढळून आल्या. पोलिसांनी या तलवारी जप्त केल्या असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पालकांनी मुलांच्या हालचालींकडे लक्ष द्यावे
अल्पवयीन मुलांच्या हातात धारदार शस्त्रे आढळून येणे ही चिंतेची बाब असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आजच्या काळात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती सहज उपलब्ध होते. चित्रपट, वेब सिरीज, सोशल मीडिया तसेच चुकीच्या संगतीचा प्रभाव पडून काही अल्पवयीन मुले शस्त्रे बाळगणे किंवा त्यांचे प्रदर्शन करणे अशा बेकायदेशीर कृत्यांकडे आकर्षित होण्याची शक्यता असते.
या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या पाल्यांच्या मित्रपरिवारावर, दैनंदिन हालचालींवर, मोबाईल व सोशल मीडियावरील वापरावर तसेच वर्तनातील बदलांवर विशेष लक्ष ठेवावे. पाल्यांकडे अचानक धारदार शस्त्रे किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास दुर्लक्ष न करता तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
अल्पवयीन मुलांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी केवळ पोलिसांची नसून पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक घटकाची आहे. मुलांना योग्य संस्कार, मार्गदर्शन आणि कायद्याची जाणीव करून देणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
जालना जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध शस्त्रे बाळगणारे, त्यांची विक्री करणारे तसेच अशा गैरकृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल निदर्शनास आल्यास पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तेघबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक किरण बिडवे, सहायक पोलीस निरीक्षक मनसुख वेताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तांगे, राजेंद्र पवार, अभिजीत वायकोळे आणि शिवाजी जमधडे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.