जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने आवर्तन सोडा!
आमदार हिकमत दादा उढाण यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आग्रही मागणी
मुंबई :- घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार हिकमत दादा उढाण यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन केली.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पावसाच्या खंडामुळे पाणीटंचाईचे संकट गंभीर बनले आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच पशुधनासाठी चारा आणि पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट होत आहे. या परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार हिकमत दादा उढाण यांनी जलसंपदा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनाबाबत सकारात्मक निर्णय घेऊन घनसावंगी मतदारसंघातील गावांना तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सध्याची परिस्थिती लक्षात घेता पाण्याचे नियोजन तातडीने करणे गरजेचे असून, वेळेत आवर्तन मिळाल्यास शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका आमदार हिकमत दादा उढाण यांनी मांडली.