Wednesday, September 30, 2026
Homeऔरंगाबादऊसतोड कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल शेतकऱ्यांच्या बांधावर सेवा...

ऊसतोड कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल शेतकऱ्यांच्या बांधावर सेवा संकल्प अभियानांतर्गत अंबड येथे ऊसतोड कामगारांचे शिबिर; ऊसतोड कामगारांचा सहभाग

ऊसतोड कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल शेतकऱ्यांच्या बांधावर

सेवा संकल्प अभियानांतर्गत अंबड येथे ऊसतोड कामगारांचे शिबिर; ऊसतोड कामगारांचा सहभाग

 

जालना :- ऊसतोड कामगारांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी अंबड महसूल उपविभागाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत ऊसतोड कामगार समस्या निराकरण व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शिबिराला भेट देऊन कामगार, विद्यार्थी व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शिबिराचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी केले. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, कुपोषण, महिलांचे आरोग्य, घरकुल तसेच विविध शासकीय कागदपत्रे व योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी त्यांनी मांडल्या. कामगारांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे पारधी यांनी यावेळी सांगितले. हे शिबिर केवळ एक दिवसापुरते मर्यादित न राहता कामगारांच्या प्रश्नांवर पुढील काळातही प्रशासनाकडून काम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ऊसतोडीसाठी जिल्ह्याबाहेर किंवा अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यापूर्वी कामगारांनी जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या ‘ऊस मित्र’ ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच, कामावर जाण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये स्थलांतराची नोंद करावी, असेही सांगण्यात आले. कामगारांची नोंद प्रशासनाकडे उपलब्ध झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत शासकीय योजना, मदत आणि आवश्यक सेवा पोहोचविणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिबिरात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी ऊसतोड महिलांशी संवाद साधला. ऊसतोडीसाठी होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी महिलांनी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरू करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. अल्प कालावधीत मोठ्या संख्येने कामगारांना एकत्र करून शिबिराचे आयोजन केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले.

शिबिरानंतर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी अंबड शहरातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या शाळा व वसतिगृहाला भेट दिली. तेथील सुमारे १०० विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तसेच इतर सुविधांची त्यांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षिका डॉ. कविता गित्ते यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. स्थलांतरामुळे मुलांचे शिक्षण प्रभावित होऊ नये, यासाठी पालकांनी विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले.

शिबिरानंतर जिल्हाधिकारी मित्तल यांनी अंबड तालुक्यातील धनगर पिंप्री शिवाराला भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पावसाअभावी तालुक्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, चारा टंचाई आणि पाणीटंचाईच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. आगामी काळातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबतही ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली.

पिकांचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावेळी केले. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संकटाच्या काळात प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले.

अंबड येथील स्थानिक कार्यालयात झालेल्या या शिबिराला दीड ते दोन हजार ऊसतोड कामगार उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनासाठी अंबडचे तहसीलदार सोमेश मोहिते आणि घनसावंगीचे तहसीलदार रमेश पागोटे यांनी विशेष परिश्रम घेतले. अखिल भारतीय शबरी माता संघटनेचे दीपक बर्डे, गजानन बर्डे, भाऊसाहेब बर्डे, हरीशभाऊ राठोड तसेच अंबड तालुक्यातील बाजिंदर मोरे यांनीही आयोजनात सहभाग घेतला.

शिबिराला विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच जिल्हा व तालुकास्तरीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ऊसतोड कामगारांच्या समस्या, त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत प्रशासनाने एकाच दिवशी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांशी संवाद साधला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments