‘राष्ट्रीय लव पीपल डे’निमित्त शिवछत्रपती महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पाचोड/प्रतिनिधी/ मानवता हीच समाजाच्या प्रगतीची खरी शक्ती असून प्रत्येक व्यक्तीने जात, धर्म, भाषा आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या भावनेतून वर्तन करणे गरजेचे आहे. समाजात परस्पर सहकार्य, प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाची भावना वाढीस लागली पाहिजे, असे प्रतिपादन शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी केले.
शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘राष्ट्रीय लव पीपल डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल बोडखे, सतीश कोरडे, विजय चव्हाण आणि ज्ञानेश्वर सागडे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना विठ्ठल बोडखे यांनी ‘महाविद्यालयीन शिक्षण आणि शैक्षणिक प्रवास ते यशस्वी उद्योजक’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान व कौशल्यांचा विकास करून विद्यार्थ्यांनी भविष्यात विविध क्षेत्रांत यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी सांगितले.
सतीश कोरडे यांनी महाविद्यालयीन जीवन हे केवळ शिक्षण घेण्यापुरते मर्यादित नसून व्यक्तिमत्त्व आणि भविष्य घडविण्याचा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून करिअरचे योग्य नियोजन करावे. ज्ञान, कौशल्य, शिस्त आणि वेळेचे व्यवस्थापन या गुणांच्या आधारे भविष्यातील आव्हानांना सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. चंद्रसेन कोठावळे म्हणाले की, आधुनिक जीवनशैलीमुळे समाजातील मानवतेची भावना कमी होताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वर्तनातून मानवतेचा परिचय देणे आवश्यक आहे. गरजू व्यक्तींना मदत करणे, इतरांच्या अडचणी समजून घेणे, सहकार्याची भावना जोपासणे आणि समाजहिताला प्राधान्य देणे हीच खरी मानवसेवा आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची जाणीव आपल्या जीवनात रुजवावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विनोद कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विठ्ठल देखणे यांनी केले, तर आभार डॉ. भगवान जायभाय यांनी मानले.यावेळी डॉ. सुरेश नलावडे, डॉ. विलास महाजन, डॉ. सुभाष पोटभरे, डॉ. उत्तम जाधव, प्रा. सचिन कदम, वैभव राऊत, श्रीकांत चिंचखेडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.