वैजापूर-शिर्डी महामार्गालगत परप्रांतीय तरुणाची हत्या करून मृतदेह जाळला
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई दोन आरोपी अटक
आत्ताच एक्सप्रेस
वैजापूर/प्रतिनिधी/ वैजापूर ते शिर्डी जाणाऱ्या महामार्गालगत बेलगाव शिवारात एका परप्रांतीय मजुराची निर्घृण हत्या करून, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळणाऱ्या दोन नराधम आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही तासांत मुसक्या आवळल्या आहेत. केवळ ३५० रुपयांच्या लुटीसाठी आणि ओळख पटू नये म्हणून हा अंगावर काटा आणणारा प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
*जळालेल्या अवस्थेत मिळाला होता मृतदेह*
१७ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या पूर्वी बेलगाव शिवारातील एका पडीक शेतातील झुडपांमध्ये एका अज्ञात पुरुषाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (अमृ नं. ५९/२०२६ कलम १९४ बीएनएस) नोंद करण्यात आली होती. घटनास्थळावर पोलिसांना एक मोबाईल सापडला. हाच मोबाईल तपासाचा मुख्य दुवा ठरला.
मोबाईल आणि फोटोंवरून पटली ओळख
पोलिसांनी परिसरातील नागरिकांना मोबाईलमधील फोटो दाखवून चौकशी केली असता, सदर व्यक्ती शंकर ज्ञानदेव मलिक यांच्याकडे विहीर खोदण्याचे (ब्लास्टिंगचे) काम करत असल्याची माहिती मिळाली. मलिक यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, मृत व्यक्तीचे नाव *सिताराम सज्जनलाल बावरी* (वय ३०, रा. रुपाहेलीकला, ता. हुरडा, जि. भिलवाडा, राज्य राजस्थान) असल्याचे समोर आले. तो मागील ५-६ दिवसांपासून समाधान गडाख (रा. बेलगाव) यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम करत होता व १५ जूनच्या रात्री ११ वाजल्यापासून बेपत्ता होता. राजस्थान येथील नातेवाईकांनी मृतदेहाची पाहणी करून तो सितारामचाच असल्याचे ओळखले. याप्रकरणी मृताचा भाऊ राधेशाम सज्जनलाल बावरी (वय ३६) यांच्या फिर्यादीवरून १९ जून रोजी वैजापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा (गुरन ३८६/२०२६ कलम १०३, २३८ बीएनएस) दाखल करण्यात आला.