जालना जिल्ह्यात संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे अनुदान रखडल्याने लाभार्थ्यांचे हाल
वानखेडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर
जालना/प्रतिनिधी/ जालना जिल्ह्यातील संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेतील हजारो लाभार्थ्यांना गेल्या काही महिन्यांपासून अनुदानासाठी मोठी वाट पाहावी लागत आहे. सरकारी धोरणानुसार दरमहा 1 ते 5 तारखेच्या आत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच आहे. याबाबत माँ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, एप्रिल 2026 महिन्याचे अनुदान काही लाभार्थ्यांना मिळाले. तर अनेकांना अद्याप मिळालेले नाही. तसेच, मे 2026 महिन्याचे अनुदान तर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमाच झाले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.या योजनेतील बहुतांश लाभार्थी हे वृद्ध, निराधार आणि दिव्यांग आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना आणि दैनंदिन गरजांसाठी त्यांना पूर्णपणे या अनुदानावर अवलंबून राहावे लागते. सध्याच्या महागाईच्या काळात वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे अनेक महिला लाभार्थ्यांना उसणवारी करून घरखर्च चालवावा लागत आहे. धोंडे जेवणासारख्या सणासुदीच्या काळातही खिशात पैसे नसल्याने त्यांना कर्ज काढून सण साजरा करावा लागल्याची हृदयद्रावक माहितीही या निवेदनात दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केली होती की, संजय गांधी निराधार, श्रावण बाळ आणि दिव्यांग योजनेचे अनुदान दरमहा 1 ते 5 तारखेच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाईल. मात्र, जालना जिल्ह्यात या घोषणेची अंमलबजावणी होत नसल्याने गोरगरिबांचा विश्वास डळमळीत होत आहे.
