जमीन तक्रारींसाठी एसआयटी, नागरिकांना
10 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर :- जिल्ह्यातील नागरिकांच्या जमिनींसंबंधित विविध तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, नागरिकांनी 10 एप्रिल 2026 पर्यंत तक्रार अर्ज सादर करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
शासन निर्णयानुसार विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या अनुषंगाने 11 मार्च 2026 रोजी वृत्तपत्रांद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत 7 एप्रिल 2026 पर्यंत एकूण 16 तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.
आज विभागीय आयुक्त पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली एस आयटीची बैठक पार पडली. या बैठकीत प्राप्त अर्जांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली.
सदर अर्जांची तपासणी करून 10 एप्रिल 2026 पर्यंत प्राप्त होणारे सर्व अर्ज जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर तसेच संबंधित विभागांकडे पाठवून त्यावर वस्तुस्थितीदर्शक अहवाल व स्वयंस्पष्ट अभिप्राय मागविण्याचे निर्देश देण्यात आले.
तक्रार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 एप्रिल 2026 असल्याने, ज्या नागरिकांना आपली तक्रार मांडायची आहे त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे वेळेत अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
