भारत – नेपाळ संबंध सुधारतील?
नेपाळ हा भारताचा शेजारी देश असून भारताच्या मित्र देशांपैकी एक देश आहे. भारत आणि नेपाळची संस्कृतीही जवळपास सारखीच आहे. जगातील एकमेव हिंदू देश अशी नेपाळची ओळख आहे. भारतातही बहुसंख्य हिंदुधर्मीय लोक असून भारताचा सर्वाधिक विश्वासार्ह देश अशी नेपाळची ओळख आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच नेपाळशी आपले मैत्रीचे आणि सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यानची सीमारेषाही आपण मुक्त केली आहे म्हणजे नेपाळमधील कोणताही नागरिक व्हिसा शिवाय भारतात प्रवेश करू शकतो तसेच भारतात व्यवसायही करू शकतो. नेपाळचे लाखो नागरिक आज भारतात वास्तव्य करून आहेत. दोन्ही देशात रोटीबेटीचा व्यवहार देखील होतो असे असले तरी तरी गेल्या काही वर्षात नेपाळ आणि भारतात प्रचंड कटुता निर्माण झाली आहे. दोन्ही देशातील सौहार्दपूर्ण संबंध बिघडले आहेत. एकेकाळी भारताला सच्चा मित्र मानणारा नेपाळ आता भारताला स्पर्धक समजू लागला आहे. इतकेच नाही तर भारताचा भूभाग आपल्या नकाशात दाखवून भारताच्या सार्वभौमत्वालाच आव्हान देऊ लागला आहे. के पी ओली शर्मा नावाचे गृहस्थ जेंव्हा नेपाळचे पंतप्रधान बनले तेव्हापासून दोन्ही देशातील कटुता वाढत गेली. के पी ओली शर्मा हे नेपाळचे पंतप्रधान बनल्यावर त्यांनी भारताशी असलेले सौहार्दाचे संबंध तोडून टाकले आणि भारताला आपला प्रतिस्पर्धी म्हणून घोषित केले अर्थात याला चीन जबाबदार आहे. के पी ओली शर्मा चीन धार्जिणे होते. चीनच्या नादी लागून त्यांनी भारताच्या सतत खोड्या काढण्याचा उद्योग केला. कधी त्यांनी भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखवला तर कधी नेपाळच्या चलनी नोटांवर भारताचा भूभाग छापून भारताला चिथावले. अर्थात हा सर्व चीनच्या रणनीतीचा भाग होता. भारताच्या शेजारी असलेल्या देशांना साम, दाम, दंड, भेद या मार्गाचा वापर करून भारताविरुद्ध फितवायचे आणि स्वतःकडे वळवायचे आणि त्याद्वारे भारतावर दबाव आणायचा ही रणनीती होती अर्थात आजही ती आहे याच रणनितीला के पी ओली शर्मा हे बळी पडले आणि त्यांनी भारताला थेट आव्हान दिले त्यामुळे दोन्ही देशात कटुता निर्माण झाली. आता मात्र चित्र बदलत आहे कारण चीन धार्जिणे के पी ओली शर्मा यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात नेपाळच्या जेन झी ने मागील वर्षी मोठा उठाव केला त्यात के पी ओली शर्मा यांना आपली खुर्ची सोडावी लागली. के पी ओली शर्मा पदभ्रष्ट झाल्यानंतर नेपाळमध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत ३५ वर्षाच्या बालेंद्र शहा उर्फ बालेन या तरुणाच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने ( आर एस पी ) बहुमत मिळवले आणि त्यांच्या पक्षाने बालेंद्र शहा यांची नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून घोषणा केली. राम नवमीच्या मुहूर्तावर बालेंद्र शहा यांनी नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. बालेंद्र शहा यांनी नेपाळची सूत्रे हाती घेतल्यामुळे भारत आणि यांच्यातील संबंध पूर्वीप्रमाणे सौहार्दाचे होतील अशी आशा निर्माण झाली आहे कारण पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्या पासून त्यांनी भारताविरुद्ध एकही वक्तव्य केले नाही अर्थात काठमांडूचे महापौर असताना त्यांनी भारत विरोधी भूमिका घेत ग्रेटर नेपाळचे समर्थन करत भारताला दुखावले होते आता मात्र त्यांची ती भूमिका बदलेल अशी आशा करायला हरकत नाही कारण बालेंद्र शहा पंतप्रधान बनल्यावर आपल्या पतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले त्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत दोन्ही देशात मैत्रीचे संबंध निर्माण होतील अशी ग्वाही दिली. अर्थात त्यांच्याकडून तशी अपेक्षा करायला हरकत नाही कारण बालेंद्र शहा आणि आपले खूप जवळचे संबंध आहेत. बालेंद्र शहा यांचे शिक्षण भारतातच झाले आहे. त्यांनी बंगळुरूच्या विश्वेशरय्या युनिव्हर्सिटीमधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यांची एक बहीण बंगळुरूमध्येच राहते त्यामुळे भारताबाबत त्यांच्या मनात निश्चितच आदर असेल. अर्थात त्यांच्या मनात चीनबद्दल असलेले आकर्षण लपून राहिले नाही असे असले तरी पंतप्रधान म्हणून ते चीनच्या कच्छपी लागणार नाहीत अशी आशा करूया. भारतानेही याबाबत कुटनितीक पावले टाकून बालेंद्र शहा यांना भारताकडे वळवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरात लवकर नेपाळचा दौरा करून बालेंद्र शहा यांची भेट घ्यावी त्यामुळे दोन्ही देशात बिघडलेले संबंध पूर्ववत होतील आणि दोन्ही देशात मैत्रीचे संबंध प्रस्थापित होतील.
-श्याम ठाणेदार