२३ मार्च शहीद दिवस
प्रति, माननीय संपादकजी,
विषय:- सुर्य-चंद्र-आकाश-पाताळ आहे,तोपर्यंत भारतमातेच्या भुमिपुत्रांचे नाव अमर राहील.
आज शहीदांच्या पुंण्यायीनेच देशाची १४० कोटी जनता खुला स्वास घेत आहे.अनेक क्रांतिकारक,थोर पुरुष यांच्या अथक परिश्रमाने,प्रयत्नाने व बलिदानाने १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. क्रांतिकारकांनी कोणत्याही गोष्टीची व आपल्या परिवाराची पर्वा न करता इंग्रजांना सडेतोड उत्तर देऊन स्वतंत्र भारताची मशाल १९४७ ला प्रज्वलीत केली.१९२८ ला भारतातील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून सायमन कमिशन नावाचे शिष्टमंडळ भारतात आले.त्यावेळी सायमन कमिशन नावाचे वादळ रोखण्यासाठी लाला लजपतराय यांनी पुढाकार घेऊन “सायमन परत जा”च्या घोषणांनी संपूर्ण भारत एकवटला.ही बाब सायमन कमिशनचे अधिकारी सॅंडर्स यांना पचली नाही.लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने प्रदर्शनकारी जमा झाले.यामुळे सायमन कमिशनची घाबरगुंडी उडाली. जमाव पांगवण्यासाठी सॅंडर्स यांनी लाठीचार्जचा आदेश दिला.यात लाला लजपतराय घायाळ झाले आणि त्यातच १७ डिसेंबर १९२८ ला त्यांचा अंत झाला.त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली. हे दु:ख भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना पाहवले नाही. त्यामुळे क्रांतिकारकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी क्रांतिकारकांनी दृढनिश्चय करून व्युहरचना तयार केली आणि लाला लजपतराय यांच्या मृत्यूला कारणीभूत असणारा इंग्रज अधिकारी सॅंडर्स याला ठार मारण्याचे ठरविले.लाला लजपतराय यांच्या पहिल्या मासिक श्राध्दाच्या दिवशी भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही वेष बदलुन सॅंडर्स यांच्या निवासस्थानी गेले.सॅंडर्स दिसताच सुखदेव यांनी संकेत दिले. संकेत मिळताच भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाचवेळी गोळ्या झाडून सॅंडर्सला जागीच ठार केले व तेथुन पलायन केले.यामुळे इंग्रज आगबबुला झाले व इंग्रजांनी तिघांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.बरेच दिवस इंग्रजांना हुलकावणी देत तिन्ही क्रांतिकारक भूमिगत राहिले. परंतु फितुरीमुळे ते पकडले गेले. शेवटी २३ मार्च १९३१ ला भारतमातेच्या तिन्ही सुपुत्रांना इंग्रजांनी फाशी दिली. यामुळे संपूर्ण भारत स्तब्ध होऊन सर्वत्र शोककळा पसरली.भारत स्वतंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या तिन्ही सुपुत्रांना कोन्हीही कधीही विसरणार नाही.”जो पर्यंत सुर्य-चंद्र, आकार-पाताळ आहे तोपर्यंत या शहिदांना कोणीही विसरणार नाही”. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचे बलीदान पाहून १४० कोटी जनतेच्या तळपायाची आग आजही मस्तकात जाते.परंतु ९५ टक्के राजकीय पुढारी शहिदांना विसरल्याचे दिसून येते.कारण ९५ टक्के राजकीय पुढारी आज देशसेवा, सामाजिक सेवा व देशांच्या विकासापेक्षा स्वत:च्या विकासाकडे जास्त लक्ष देताना दिसतात.राजकीय पुढाऱ्यांनो याद राखा जोपर्यंत तुम्ही देशाच्या विकासासाठी, जनतेच्या हितासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी संपूर्णपणे ताकद लावणार नाही तोपर्यंत शहिदांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही व त्यांना राजकीय दृष्ट्या खरी श्रद्धांजली म्हणता येणार नाही. क्रांतिकारक,शहिद हसत-हसत फासावर का चढले यामागचा त्यांचा एकच उद्देश होता.तो म्हणजे मातृ भुमिची रक्षा करून सर्वसामान्यांना न्याय मिळावा व भारत स्वतंत्र होवून सुख शांती निर्माण व्हावी आणि देश सुजलाम सुफलाम व्हावा.परंतु आजचा राजकीय पुढारी असा झाला आहे की “लोका सांगे ग्याण व स्वत: कोरडे पाषाण” यामुळेच या कृषी प्रधान देशात मुठभर राजकीय पुढारी भ्रष्टाचाराच्या मार्गाने करोडपती झाल्याचे दिसून येतात व करोडपती शेतकरी शुन्य झालेला दिसुन येतो.कारण आजचा राजकीय पुढारी पाच वर्षासाठी लोकप्रतिनिधी बनतो खरा परंतु पाच वर्षाच्या काळात करोडपती बनतो ही कसली देश सेवा,कसली देश भक्ती म्हणावी!भारतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की श्रीमंत हा दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे व गरीब, सर्वसामान्य,शेतकरी हा गरीबीच्या खाईत जात आहे.या संपूर्ण बाबींची जान राजकीय पुढाऱ्यांनी ठेवली पाहिजे व देशसेवा आणि जनसेवा याकडे सर्वांनीच लक्ष केंद्रित केले पाहिजे तेव्हाच राजकीय पुढाऱ्यांची शहीदांना खरी श्रद्धांजली समजल्या जाईल.राजकीय पुढाऱ्यांना कोणत्याही लढाईवर जाण्याची गरज नाही.फक्त शहिदांचे अनुकरण करून लोकप्रतिनिधी,जनप्रतिनिधी या पदाला कलंकित न करता यांचा योग्य उपयोग करून जनसेवा व लोककल्याणाची कामे केली पाहिजे. तेंव्हाच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल व शहिदांच्या आत्म्याला शांती मिळेल.संपुर्ण देश शहिद दिनाला शहिदांना आपली आदरांजली अर्पण करीत आहे.परंतु शहिदांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही याची जाण मुख्यत्वेकरुन राजकीय पुढाऱ्यांनी ठेवण्याची गरज आहे.राजकीय पुढाऱ्यांनो थोडे ७९ वर्षे मागे वळून पहा व क्रांतिकारकांना देश स्वातंत्र्यासाठी कायकाय यातना भोगाव्या लागल्यात याचे अनुकरण करून चिंतन करा आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजसेवा करण्याची तत्परता दाखवा.कारण राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष देशसेवेपेक्षा फक्त स्वतःचे हीत साधण्याचा प्रयत्न जास्त असतो.दिनांक १९ मार्च २०२५ बुधवारला अनेक वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या माहितीनुसार जाहीर केलेल्या एका स्वयंसेवी संस्था असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉम्सच्या (एडीआर) अहवालात असे दिसून आले की देशातील ४५ टक्के आमदारांवर गुन्हेगारीचे खटले दाखल आहेत ही स्वतंत्र भारतासाठी दुःखद व धक्कादायक बाब आहे.यांना कसले लोकप्रतिनिधी म्हणावेत हाही प्रश्न उपस्थित होतो.त्यामुळे यावर अंकुश लावने अत्यंत गरजेचे आहे.करीता सावधान राजकीय पुढाऱ्यांनो कोणतेही कार्य करतांना शहिदांचे अनुकरण अवश्य करावे व त्यांच्या बलीदानाला कोठेही ठेच किंवा तडा पोहचणार नाही याची दक्षता घ्यावी. शहिद दिनाच्या निमित्ताने देशवासीयांना हेच सांगु इच्छितो की बदलत्या हवामानामुळे व युद्धजन्य परिस्थितीमुळे देशातील वाढते प्रदुषण धोकादायक स्थितीत येवून ठेपले आहे आणि प्रदूषणाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो.याकरीता शहिद दिनाचे औचित्य साधून राजकीय पुढारी, सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी आपल्यापरीने वृक्षारोपण करून जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला पाहिजे हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल व हे वृक्ष अनंत काळापर्यंत आपल्या स्मरणात राहील आणि शहिदांचे स्मरण आपल्याला प्रत्येक झाडाच्या पानात, फुलात,फळात दिसुन येईल.हे भारत मातेच्या शहिद भुमि पुत्रांनो माझा कोटी कोटी प्रणाम “जब तक सुरज चांद रहेंगा तबतक शहिदोंका नाम रहेंगा”जय हिंद! जय भारत.
– रमेश कृष्णराव लांजेवार
