पैठणमधील नाथषष्ठी उत्सवातील ‘नाथांचा रांजण’ संतोष कुलकर्णी यांच्या कावडीने भरला
पैठण/प्रतिनिधी/ पैठण येथे नाथषष्ठी उत्सवानिमित्त पारंपरिक ‘नाथांचा रांजण भरणे’ हा धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. भाविक गोदावरी नदीतून पवित्र जल आणून संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील रांजण भरतात. शतकानुशतके सुरू असलेली ही परंपरा यंदाही भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडली.
परंपरेनुसार, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने श्रीखंड्या या रूपात तब्बल १२ वर्षे संत एकनाथ महाराजांच्या सेवेत राहून गोदावरीचे पाणी आणून रांजण भरण्याचे कार्य केले, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्या स्मृती जागवत संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील पवित्र रांजण दरवर्षी नाथषष्ठीनिमित्त भाविकांच्या घागरीने भरला जातो.
यंदा हा पवित्र रांजण सकाळी ७.५० वाजता संतोष विठ्ठलराव कुलकर्णी राहणार ह.मु पैठण यांच्या घागरीतील गोदावरीच्या पाण्याने भरला. रांजण भरताच उपस्थित भाविकांनी जयघोष करत आनंद व्यक्त केला.हि बातमी वाऱ्यासारखी पैठण शहरात व परिसरात पोहचताच नाथ भक्तांनी एकामेकांना अलिंगन देऊन एकनाथ महाराजांचा तथा भगवान श्रीखंड्याचा जय जयकार केला.
यावेळी ह. भ. प. रघुनाथबुवा नारायणबुवा गोसावी पालखीवाले (नाथवंशज) यांनी संतोष कुलकर्णी यांचे ‘श्रीखंड्या’ अर्थात श्रीकृष्णाचे रूप मानून त्यांचे विधीवत पूजन केले. नाथषष्ठीच्या पारंपरिक विधींनुसार हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पैठणमध्ये नाथषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, राज्यभरातून हजारो भाविक येथे दाखल झाले आहेत. संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील हा रांजण भरण्याचा सोहळा नाथषष्ठी उत्सवातील प्रमुख धार्मिक परंपरांपैकी एक सोहळा मानला जातो.
आख्यायिकेनुसार, श्रीखंड्या रूपातील भगवान श्रीकृष्णाने संत एकनाथ महाराजांची सेवा करत गोदावरीचे पाणी आणण्याचे कार्य केले होते. त्या स्मृती जपणारी ही परंपरा आजही अखंडपणे सुरू असून भाविक मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभागी होतात.रांजणाला सुशोभित चांदीचा पत्रा बसविण्यात येऊन रांजणातील पाणी नेहमीसाठी शुद्ध राहिल असे नियोजन करण्यात यावे अशी मागणी वारकरी व नाथ भक्तांनी केली आहे.