Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादराज्यात 'महा जन आरोग्य केंद्र' सुरु करा ! बहुजन नेते,...

राज्यात ‘महा जन आरोग्य केंद्र’ सुरु करा ! बहुजन नेते, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांची मागणी   सर्वसामान्यांसाठी ‘महा जन आरोग्य योजना’ राबवण्याचे आवाहन

राज्यात ‘महा जन आरोग्य केंद्र’ सुरु करा !
बहुजन नेते, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांची मागणी  
सर्वसामान्यांसाठी ‘महा जन आरोग्य योजना’ राबवण्याचे आवाहन

पुणे :- पुण्यनगरीतील लोकसंख्या ४० लाखांच्या पुढे गेली असतांना महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य सुविधांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. राज्यातील इतर महानगर पालिकांमध्ये देखील काहीशी अशीच स्थिती आहे. सर्वसामान्यांसाठी त्यामुळे ‘महाराष्ट्र जन आरोग्य योजना’ राबवत देशातील इतर राज्यांना दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने करावे, असे आवाहन बहुजन नेते, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी बुधवारी (ता.२५) केले. दर १० हजार लोकसंख्येमागे एक ‘महा जन आरोग्य केंद्र’ सुरू करावे, तर १ लाख लोकसंख्येमागे महापालिकेने एक सुसज्जित रुग्णालय योजनेअंतर्गत उभारावे, अशी मागणी देखील डॉ.चलवादी यांनी केली.

येत्या ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडतील.अर्थसंकल्पातून या योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, याकरिता त्यांच्यासोबत पत्रव्यवहार देखील करणार असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. सर्वसामान्यांवरील उपचार खर्चाचा वाढता ताण लक्षात घेता केंद्र, राज्य सरकारच्या आरोग्य योजनेसह महापालिकांची स्वतंत्र योजना आवश्यक आहे. आरोग्य हा राज्यांच्या अखत्यारित असलेला विषय असला तरी केंद्र सरकारने सुसज्जित पालिका रुग्णालये उभारण्यासाठी निधी द्यावा, असे आवाहन देखील डॉ.चलवादी यांनी केले.

प्रशासनाच्या मदतीने लोकवर्गणी गोळा करून थेट नागरिकांच्या सहकार्याने रुग्णालये उभारत सामाजिक दायित्वाचे कर्तव्य देखील पार पाडले जाऊ शकते,अशी संकल्पना त्यांनी मांडली. सर्वसामान्य, गोरगरीब, वंचित, पीडितांना याचा थेट फायदा त्यामुळे होवू शकतो.सार्वजनिक आरोग्य सुविधेच्या बाबतीत पुणे शहर एक मॉडेल ठरेल,असे डॉ.चलवादी म्हणाले.

शहरात हजारो कोटींची विकासकामे होत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या गंभीर रुग्णांवरचा ताण ससूनसारख्या मोठ्या सरकारी रुग्णालयांवर आहे, तर खासगी रुग्णालयांचे बिल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. कोरोनानंतर तपासण्या, औषधे आणि रुग्णालयीन खर्च ३० ते ५० टक्क्यांनी वाढले आहे.

गरिब, वंचित आणि मध्यमवर्गीय नागरिक लाखो रुपयांचे कर्ज काढून उपचार घेत आहेत. ही परिस्थिती थांबवायची असेल तर स्थानिक पातळीवर सुसज्ज, मोफत व किफायतशीर आरोग्य सुविधा उभारणे सरकारसह समाजाची जबाबदारी आहे, असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले. आरोग्य हाच खरा विकासाचा पाया असून, ‘महा जन आरोग्य योजनेचे’ मॉडेल तातडीने राबवावे, असे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments