Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादउबाठांच्या आमदारकीसाठी संजय राऊत काँग्रेसपुढे लाचार भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ...

उबाठांच्या आमदारकीसाठी संजय राऊत काँग्रेसपुढे लाचार भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात

उबाठांच्या आमदारकीसाठी संजय राऊत काँग्रेसपुढे लाचार

भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात

राज्यसभेच्या एका जागेवरून उबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेस मध्ये खेचाखेच चालू आहे. उद्धव ठाकरेंना पुन्हा आमदार करण्यासाठी आणि आपण पुन्हा खासदार होण्यासाठी संजय राऊतांना काँग्रेसपुढे लाचार आणि शरद पवारांचे गुलाम व्हावे लागत आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘मविआ’ मध्ये राज्यसभेच्या जागेवरून ‘तिन तिगाडा काम बिगाडा’ अशी स्थिती असल्याची टीका करत श्री. बन म्हणाले की, राऊत म्हणतात विधान परिषद उद्धव ठाकरेंना मिळावी मात्र काँग्रेसच्या भूमिकेवर हे सर्व अवलंबून आहे. परवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की राज्यसभा काँग्रेसला मिळायला हवी तरच विधान परिषद उबाठाला देण्याचा विचार होईल. राऊतांची मुदत संपल्यानंतर त्यांचा खासदारकीवर डोळा असल्याने प्रियांका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करून शरद पवारांनी राज्यसभेवर जावे यासाठी राऊत आग्रही आहेत. उबाठाची प्रवक्तेगीरी करत असताना काँग्रेसची लाचारी आणि शरद पवार गटाची गुलामी करायचे संजय राऊतांचे धोरण आहे. राज्यसभेवरून उबाठा गटात पण दोन गट पडले आहेत राऊत शरद पवारांच्या नावावर तर दुसरा गट प्रियांका चतुर्वेदी यांच्यासाठी आग्रही असल्याचे ते म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीतील उभी फूट महाराष्ट्राला दिसून आली. विरोधकांच्या पत्रकार परिषदेला मविआचे सर्व नेते अपेक्षित असताना शरद पवार गटाचा एकही आमदार उपस्थित नव्हता. विरोधकांकडून राज्य सरकारला पत्र लिहायची जेव्हा वेळ आली तेव्हा तर राष्ट्रवादी शप गटाच्या माजी आमदाराची त्यावर स्वाक्षरी घ्यायची वेळ येऊन ठेपली असे म्हणत मविआमध्ये केवळ उभी फूट नाही तर मविआ पूर्णपणे खिळखिळी झाल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिल्याचे त्यांनी नमूद केले.

राऊतांनी लोकशाहीच्या बाता मारू नयेत

                ज्यांचा उबाठा गट हा घराणेशहीवर उभा राहीला आहे त्या राऊतांनी लोकशाहीच्या मोठमोठ्या बाता मारणे बंद करावे असे श्री. बन यांनी खडसावले. राऊतांचा उबाठा गट घराणेशाहीवर उभा आहे हे विसरलात का असा खोचक सवाल श्री. बन यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने पूर्वापार लोकशाहीची मूल्ये देशामध्ये जोपासण्यासाठी मोठे प्रयत्न केले.मात्र काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटून देशावर आणीबाणी लादली, राजकारणात घराणेशाही लादली असा घणाघात त्यांनी केला. त्यामुळे लोकशाही मूल्यांबद्दल बोलण्याचा काँग्रेसलाही अधिकार नसल्याचे ते म्हणाले.

विरोधी पक्षनेतेपदावरून मविआमध्ये एकवाक्यता नाही

विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपा महायुती सरकारवर नाहक खापर फोडू नका, मविआमधील तीन पक्षांमध्येच विरोधी पक्षनेता कोणाला करायचे यावर एकवाक्यता नाही असा प्रहार श्री. बन यांनी केला. सर्वांनाच विरोधी पक्षनेते पद हवे आहे. विरोधी पक्षनेतेपद हे जनता ठरवत असते विरोधी पक्षनेते पद मिळण्यासाठी तुमच्याकडे संख्याबळ असावे लागते. एकूण आमदारांच्या किमान दहा टक्के आमदार हे राऊत उबाठा गट अथवा मविआच्या कोणत्याही घटक पक्षाला मिळाले असते तर विरोधी पक्ष नेते पद त्या पक्षाला मिळाले असते. मात्र विरोधी पक्ष नेते पद मिळवण्याची लायकीही मविआतील कोणत्याही पक्षाची नाही हे जनतेने जाणले होते म्हणूनच तिन्ही पक्षांचा धुव्वा उडवला. विनाकारण त्याचे खापर राज्य सरकारवर फोडू नका असे श्री. बन म्हणाले.

भ्रष्टाचा-यांबाबत महायुती सरकारचा ‘झिरो टॉलरन्स’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच भ्रष्टाचाराबद्दल पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट करत म्हंटले आहे की मुख्यमंत्री कार्यालयातही भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले तर कठोर कारवाई केली जाईल. राऊत आणि मविआ भ्रष्टाचाराचे शिरोमणी आहेत. राऊत हे स्वत: भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीनावर आहेत तसेच मविआ सरकार असताना रोज 100 कोटींची वसुली केली जात होती याची आठवण करून देत श्री. बन यांनी शरसंधान साधले.

-मुकुंद कुलकर्णी

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments