पुरोगामी महाराष्ट्राने केरळचा आदर्श घ्यावा-डॉ.हुलगेश चलवादी
‘लाडके विद्यार्थी’ योजना राबवून शिक्षणाच्या कक्षा रुंदावण्याचे आवाहन
पुणे :- विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातून राज्य सरकारने ‘लाडके विद्यार्थी’ योजना सुरू करून गोरगरिब, होतकरू तसेच सर्वसामान्यांसाठी उच्च शिक्षणाचे द्वार खुले करावे; असे आवाहन शिक्षण क्षेत्रातील जाणकार, बहुजन नेते, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी रविवारी (ता.१५) केले. केरळ राज्याने सरकारी, सरकारी अनुदानित कला व विज्ञान महाविद्यालयांमधील पदविका अभ्यासक्रम पुर्णत: मोफत केला आहे. याच धर्तीवर राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने सर्व शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित करावे, असे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले.
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सरकार या योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहन देईल. हेच पाऊल छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राची नवी दिशा ठरवेल. सरकारने एससी-एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरटीईच्या माध्यमातून शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला आहे. पंरतु, केवळ आठवीपर्यंतच शिक्षण मोफत आहे. अशात गरजवंताच्या पुढील शिक्षणाची वाणवा होते. आर्थिक, मानसिक तनाव वाढत त्यांचे खच्चीकरण होतेय. क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंनी पुण्यातूनच शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीची मुर्हतमेढ रोवली होती. आरक्षण लागू करीत सर्वसामान्यांना शिक्षणाची कवाड उघडणाऱ्या छत्रपती शाहु महाराजांच्या विचारांचा वारसा चालवत महाराष्ट्राने सर्वांसाठी शिक्षण मोफत करावे, असे मत डॉ.चलवादींनी व्यक्त केले.
राज्यात इयत्ता ९ आणि १० वी मध्ये शिक्षण सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण १२.६% आणि मुलींचे प्रमाण १०.३% एवढे आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या या आकडेवारीत २०२३-२४ च्या तुलनेत १ टक्क्यांची वाढ दिसून येते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे पदवी शिक्षणापासून वंचित राहतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारनेही कला,विज्ञान, वाणिज्य तसेच इतर महत्वाच्या शाखांसाठी टप्प्याटप्प्याने शुल्कमाफीचा निर्णय घेतला, तर सामाजिक न्याय, शैक्षणिक समतेचे लक्ष साध्य करता येईल. शिक्षणावरचा खर्च हा भार नसून भविष्यावरची गुंतवणूक आहे, हे केरळने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रानेही या निर्णयाचे अनुकरण करून विद्यार्थ्यांसाठी ठोस पाऊल उचलण्याची हीच योग्य वेळ असल्याची भावना डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली
