अंबड शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्वस्त
जालना/प्रतिनिधी/ अंबड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला असून,राष्ट्रवादी काँग्रेसचा दिर्घकाळचा बालेकिल्ला उध्वस्त झाला आहे.या प्रभागातून विश्वजीत विलासराव खरात यांनी 1110 मते,तर ताराबाई बबनराव शहाणे यांनी 982 मतांच्या भक्कम मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे.या विजयासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देवयानी केदार कुलकर्णी यांना 588 मताची निर्णायक आघाडी मिळाल्याने शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे वर्चस्व होते.माजी आरोग्यमंत्री तथा पाच वेळा आमदार राहिलेले राजेश टोपे यांची येथे एकहाती सत्ता मानली जात होती.मात्र यावेळी प्रभागातील मतदारांनी बदलाची भूमिका घेत खरात व शहाणे यांना मोठ्या विश्वासाने निवडून दिले.प्रभागातील रस्ते,पाणीपुरवठा,सुरक्षा व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांकडे दिर्घकाळ दुर्लक्ष झाल्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसल्याची चर्चा नागरिकांत आहे.
याच पार्श्वभूमीवर मतदारांनी राष्ट्रवादीच्या गटाला धक्का देत नवीन नेतृत्वाला संधी दिल्याचे चित्र दिसून येत आहे.नवनिर्वाचित नगरसेवक विश्वजीत खरात व ताराबाई बबनराव शहाणे यांच्याकडून प्रभागातील रस्त्यांची कामे,पाणीपुरवठा सुधारणा,सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच इतर नागरी सुविधा जलद गतीने मार्गी लागतील,अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.या निकालामुळे अंबड शहराच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.