Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादसौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका)- देशात महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगा वाट वीज निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो,असे आश्वसन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलतांना केले.

एका महिन्यात ४५ हजार ९११ कृषी पंप

‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या विश्वविक्रमाची घोषणा करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे कार्ल सॅबेले हे ही यावेळी उपस्थित होते.

या सोहळ्यास राज्याचे इमाव बहुजन कल्याण व अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे,राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, विधान परिषद सदस्य आ. संजय केणेकर, आ. अनुराधा चव्हाण, आ. नारायण कुचे,आ. प्रशांत बंब,आ. सुरेश धस, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा मित्राचे संचालक प्रवीण परदेशी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जिवने, सहसचिव (ऊर्जा) नारायण कराड, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, संचालक सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), योगेश गडकरी (वाणिज्य), राजेंद्र पवार (मानव संसाधन), कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता पवनकुमार कछोट तसेच अभिनेते संदीप पाठक, योगेश शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.

पंच कार्ल सॅबेले यांनी केली विक्रमाची घोषणा

सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील सौरकृषी पंपाचे डिजिटल लोकार्पण करुन त्यांनी लाभार्थी  शेतकऱ्यांशी दुरदूष्य प्रणालीने संवाद साधला. त्यानंतर गिनीज बुक विक्रम नोंदचे निरीक्षक पंच कार्ल सॅबेले यांनी  विक्रमाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र व मेडल मान्यवरांना प्रदान केले. सौर कृषी पंप योजनेसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या AIIM बॅंकेसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. बॅंकेचे प्रत्युष मिश्रा व  महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

कार्ल सॅबेले म्हणाले की, विक्रमासाठी ३५ हजार पंप स्थापित करणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्षात ४५ हजार ९११ पंप स्थापित करण्यात आले, हा एक विश्वविक्रम आहे. या प्रत्येक पंपाच्या उभारणी ते कार्यान्वयन या सर्वटप्प्यांवर पडताळणी करुनच या विक्रमास मान्यता देण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

सौर ऊर्जेद्वारे १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता

श्री. फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारे सौर ऊर्जेचा वापर वाढवून आपण शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीज निर्मिती करु शकतो. शिवाय ही वीज निर्मिती कोणत्याही प्रदुषणाशिवाय असेल. तिचा निर्मिती खर्च कमी असल्याने इतर क्षेत्राला लागणारी वीज मुबलक आणि स्वस्तात उपलब्ध होईल. त्यामुळे दरवर्षी ३ टक्क्यांनी आपण विजेचे दर कमी करु, असेही त्यांनी यावेळी घोषीत केले.

ऊर्जाक्षेत्राला नवी दिशा

श्री. फडणवीस यांनी पुढे सांगितले की, सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे सौर ऊर्जा उपकरण निर्मिती कंपन्या, वेंडर्स,  कामगार, देखभाल करणारे अशा १ लाख लोकांना रोजगार मिळाला. त्यामुळे ऊर्जाक्षेत्राला नवी दिशा देणारी ही योजना आहे,असे त्यांनी सांगितले.

मराठवाड्याचा वाटा मोठा

मराठवाड्याचे कौतुक करतांना श्री. फडणवीस म्हणाले की, या योजनेच्या अंमलबजावणीत मराठवाड्याने आघाडी घेतली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ हजार पंप लावण्यात आले. शेतकऱ्यांना नानासाहेब देशमुख कृषी संजिवनी योजनेमार्फत अन्य लाभ, बाजाराची उपलब्धता देऊन शेती शाश्वत कशी होईल, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. नदी जोड सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून वाहून जाणारे पूराचे पाणी मराठवाड्यात , विदर्भात व उत्तर महाराष्ट्रात नेऊन दुष्काळ मुक्ती करायची आहे. यासर्व उपाययोजनांमुळे शेती समृद्ध आणि शाश्वत होईल. आमचे सरकार हे शेतकऱ्यांप्रती समर्पित सरकार असून शेती शाश्वत होईपर्यंत आम्ही प्रयत्न करीत राहू, असा शब्द त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व मंत्री अतुल सावे यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधून सौर कृषी पंप योजनेमुळे शेती क्षेत्रात आणि अर्थकारणात मोठे बदल होतील,असा विश्वास व्यक्त केला. या ठिकाणी लावलेल्या सौर ऊर्जा उत्पादनांच्या प्रदर्शनालाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली व पाहणी केली.

प्रास्ताविक लोकेश चंद्रा यांनी केले. तर निता पानसरे यांनी आभार मानले. नीता पानसरे, आश्विनी दाशरथे, प्रेषित रुद्रावतार यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments