जालन्याचे युवा शाहीर रामानंद उगले यांना
महाराष्ट्र शासनाचा युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार
जालना/ राज्य सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या २०२४-२५ वर्षातील राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. कलेच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंतांचा सन्मान करण्यात येणार असून यंदाच्या घोषणेत विधीनाट्य या कलावर्गातील युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार जालन्याचे युवा शाहीर रामानंद उगले यांना जाहीर झाला आहे.
पुरस्कारामध्ये एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल यांचा समावेश असून लवकरच मुंबईत होणाऱ्या समारंभात हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.
युवा शाहीर रामानंद उगले हे गोंधळी परंपरेचा अनेक पिढ्यांचा वारसा जपत आहेत. ते आणि त्यांचे बंधू – गीतकार कल्याण उगले व विशाल उगले – एकत्रितपणे आपली ही समृद्ध परंपरा पुढे नेत आहेत. त्यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून महाराष्ट्राच्या विविध लोककलांचा आदरयुक्त परिचय रसिकांपुढे सातत्याने घडवला आहे. महाराष्ट्राची लोककला सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी या उदात्त हेतूने, शाहीर रामानंद आणि कल्याण उगले यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्राची लोक गाणी’ या पहिल्या लोकसंगीत वेब सिरीजची निर्मिती केली. यातून विविध लोककला घरोघरी पोहोचवून प्रेक्षकांना आनंद आणि जाणीव व्हावी लोककलेचा व्यापक प्रसार व्हावा या उद्देशाने कार्य करत आहे. लोककलेसोबतच, शाहीर रामानंद यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणूनही आपले नाव लौकिक केले आहे. त्यांनी आजपर्यंत सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल, अमित राज, अवधूत गुप्ते, हितेश मोडक ,मनोहर गोलांबरे ,कमलेश भडकमकर यांच्यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.त्यांच्या याच बहुमोल योगदानामुळेच राज्य शासनाने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर, शाहीर रामानंद उगले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले “हा सन्मान केवळ माझा नसून, माझ्या संपूर्ण गोंधळी परंपरेचा, गुरु परंपरेचा आणि माझ्यासारख्या सर्व युवा कलावंतांचा आहे, असे मी मानतो. या सन्मानामुळे माझ्यावर लोककला संवर्धनाची आणि परंपरेची जबाबदारी अधिक वाढली आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे.”
“या निमित्ताने मी माझ्या महाराष्ट्रातील सर्व लोककलाकारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या कलेचा आदर ठेवून, त्यांची कला आत्मसात करून मी माझी कला सादर करत असतो. या बहुमानाबद्दल मी राज्य सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचेही मनःपूर्वक आभार मानतो.”
शाहीर रामानंद उगले यांच्या कला साधनेत गुरुवर्य पांडुरंग घोटकर, शाहीर सम्राट देवानंद माळी, शाहीर अप्पासाहेब उगले, शाहीर अंबादास तावरे, कृष्णा मुसळे आणि प्रा.गणेश चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे रामानंद यांच्या कलाविष्काराला अभ्यासपूर्ण आणि प्रभावी स्वरूप लाभले आहे.
पुरस्काराची घोषणा होताच जालना जिल्ह्यासह राज्यभरातील कलाकार, अभ्यासक आणि रसिकांकडून रामानंद उगले यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. गोंधळी परंपरेचा वारसा जपत आधुनिक माध्यमांतून लोककलाचा प्रसार करणाऱ्या युवा कलाकाराचा योग्य हा सन्मान आहे.
