Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादचुकलेली संघ निवड आणि फसलेली रणनीती.....

चुकलेली संघ निवड आणि फसलेली रणनीती…..

चुकलेली संघ निवड आणि फसलेली रणनीती…..
        गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय क्रिकेट संघाला ४०० पेक्षा अधिक धावांनी नमवून दक्षिण आफ्रिकेने भारताला २ – ० असे नमवून व्हाइट वॉश दिला. क्रिकेट रसिकांसाठी हा  पराभव धक्कादायक होता कारण पहिल्या कसोटीतही दक्षिण आफ्रिकेने भारताचा  असाच लाजिरवाणा पराभव केला होता. या लाजिरवाण्या पराभवानंतर क्रिकेट प्रेमींमध्ये  संतापाची लाट उसळली आहे आणि ते साहजिकही आहे कारण  भारतीय भूमीवर झालेला हा भारताचा पहिलाच पराभव नाही.  मागील वर्षी न्यूझीलंड संघानेही भारताचा असाच लाजिरवाणा पराभव करत मालिका ३ – ० ने जिंकत भारताला असाच व्हाइट वॉश दिला होता. वर्षभरात दोनदा परदेशी संघाने भारताला भारतात येऊन हरवले ते ही अतिशय लाजिरवाण्या पद्धतीने त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजीची भावना पसरली आहे.  पूर्वी भारतात येऊन भारताला हरवणे हे परदेशी संघासाठी मोठे दिव्य होते. भारतीय भूमीवर भारत अपराजितच होता. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका अशा कोणत्याच संघाला भारतात  येऊन मालिका विजय मिळविणे शक्य नव्हते. मालिकेतील एखादा दुसरा सामना ते जिंकायचे पण मालिका मात्र भारतच जिंकायचा. भारताला भारतात येऊन व्हाइट वॉश देणे ही तर अशक्यप्राय गोष्ट होती पण आता मात्र  परदेशी संघासाठी ते सहज शक्य झाली आहे. असे काय कारण आहे की भारतीय संघ आपल्याच भूमीवर जिंकू शकत नाही असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात विचारला जात आहे याचे सरळ आणि साधे उत्तर आहे ते म्हणजे चुकलेली संघ निवड आणि फसलेली रणनीती…. या  कसोटी मालिकेसाठी जो भारतीय  संघ निवडला होता तोच मुळी कसोटी क्रिकेटच्या योग्यतेचा नव्हता. या कसोटी मालिकेसाठी जो संघ  निवडला त्यातील किती खेळाडू हे कसोटी खेळण्याच्या लायक होते ? हा संशोधनाचा विषय आहे. या संघात जे फलंदाज निवडले त्यांच्याकडे कसोटी क्रिकेटसाठी लागणारे तंत्र आहे का तर याचे उत्तर नाही असेच देता येईल. कसोटी मालिकेसाठी निवडलेला संघ कसोटी दर्जाचा नव्हता. या संघात निवड झालेले खेळाडू हे आयपीएल गाजवलेले धुरंदर होते. टी २० आणि कसोटी क्रिकेट यात जमीन अस्मानचा फरक आहे. कसोटीसाठी लागणारे तंत्र आणि संयम या खेळाडूंकडे नाही.  फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी जे तंत्र लागते ते एकाही फलंदाजाकडे दिसले नाही. निवड समितीने जी चूक केली तीच किंबहुना त्याहून मोठी चूक संघ व्यवस्थापनाने केली. या मालिकेत संघ व्यवस्थापनाची रणनीती पूर्णपणे फसलेली दिसली. संघ व्यवस्थापनाने रचलेली एकही चाल यशस्वी ठरली नाही.  भारतीय संघ व्यवस्थापन संघाची घडी बसवताना गोंधळलेला दिसला. पहिल्या कसोटीत चक्क चार फिरकी गोलंदाज खेळवण्यात आले. चार फिरकी गोलंदाज खेळवण्याची संघ व्यवस्थापनाची रणनीती पूर्णपणे फसली. चार फिरकी गोलंदाज खेळवल्यामुळे एक फलंदाज कमी पडला. त्यात शुभमन गिल जायबंदी झाल्यावर आपल्याकडे फलंदाजच उरला नाही कारण यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत हे कसोटीतही टी २० चा खेळ खेळतात. ध्रुव जुरेल हा नवखा फलंदाज असल्याने त्याच्याकडून  जास्त अपेक्षा नव्हत्या. उरला एकटा के एल राहुल पण तो ही फॉर्मात नाही मग धावा करणार कोण ? जी गत पहिल्या कसोटीत झाली तीच गत दुसऱ्या कसोटीतही झाली. दुसऱ्या कसोटीत एक फिरकी गोलंदाज कमी करून नितीश कुमार रेड्डी याला  खेळवण्यात आले पण त्याने दुसऱ्या कसोटीत ना गोलंदाजीत विकेट घेतल्या ना फलंदाजीत धावा काढल्या. विशेष म्हणजे दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याला फक्त एकच षटक गोलंदाजी दिली. त्याला जर गोलंदाजीच द्यायची नव्हती तर मग त्याला खेळवलेलेच का ? त्याच्या ऐवजी एक स्पेशालिस्ट फलंदाज खेळवला असता तर किमान भारताच्या काही धावा वाढल्या तरी असत्या. पहिल्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळलेल्या वॉशिंग्टन सुंदर दुसऱ्या कसोटीत थेट आठव्या क्रमांकावर आला. दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर आलेला साई सुदर्शन फक्त हजेरी लावून गेला. ध्रुव जुरेलनेही तेच केले. या दोघांनी इंग्लंड दौऱ्यावर देखील काहीच केले नव्हते तरीही त्यांची निवड करण्यात आली. जर योग्य खेळाडूंची निवड झाली असती आणि रणनीती फसली नसती तर असा लाजिरवाणा पराभव झाला नसता. म्हणजेच चुकलेली संघ निवड आणि फसलेली रणनीती यामुळेच हा लाजिरवाणा पराभव  भारतीय संघाला स्वीकारावा लागला. या पराभवातून धडा घेऊन बीसीसीआयने निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला बरखास्त करायला हवे. बीसीसीआयने नवीन निवड समिती आणि नवा प्रशिक्षक लवकरात लवकर निवडायला हवा. प्रशिक्षकपदी गंभीर आल्यापासून भारतीय संघाची पिछेहाटच होत आहे विशेष म्हणजे सतत पराभव होऊनही गंभीर आपली रणनीती बदलायला तयार नाही तर निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर हे चुकीची संघ करत आहे. या दोघांचीही गच्छंती करण्याची वेळ आली आहे जर या दोघांना आणखी अभय दिले तर या पराभवाची पुनरावृत्तीच पहायला मिळू शकते.
-श्याम ठाणेदार
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments