कुक्कडगाव ग्रामपंचायतीचा वित्त आयोगाचा निधी ‘बेपत्ता’; अनेक तक्रारीनंतरही कारवाई नाही–ग्रामस्थांकडून आता ‘मिसिंग’ कंप्लेंटची तयारी
अंबड/प्रतिनिधी/ अंबड तालुक्यातील कुक्कडगाव ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगाच्या निधीबाबत मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, शासनमान्य हा निधी नेमका कुठे खर्च झाला याबाबत ग्रामीण भागात प्रचंड संभ्रम आणि संताप निर्माण झालेला आहे. ग्रामविकासासाठी अनिवार्य असलेला निधी प्रत्यक्ष कामांवर खर्च झाल्याचे कोणतेही पुरावे ग्रामपंचायत कार्यालय देऊ न शकल्याने निधी “बेपत्ता” झाल्याची शंका आता ठोस रूप धारण करत आहे.
*काम नाही… हिशोब नाही… पण कागदावर निधी खर्च*?
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात प्रत्यक्षात कोणतेही विकासकाम झालेले दिसत नसताना, पंचायत कार्यालयीन नोंदीत मात्र वित्त आयोगाचा निधी पूर्णतः वापरला गेल्याचा दाखला देण्यात आला आहे. मंजूर कामांची यादी, बिलं-पावत्या, खर्चाचा तपशील, पूर्णता अहवाल – या कोणत्याही कागदपत्रांचा पारदर्शक खुलासा मागील अनेक महिन्यांपासून ग्रामस्थांना मिळालेला नाही.
*जिल्हाधिकारी–मुख्याधिकारी यांच्याकडे अनेक वेळा तक्रार; तरीही कारवाई शून्य*
या प्रकरणी गावातील प्रतिष्ठित नागरिक सोपानराव गायकवाड यांनी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या कडे अनेक वेळा लिखित तक्रारी दाखल केल्या आहेत.
गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार –
*वित्त आयोगाचा निधी ग्रामसभेच्या ठरावानुसार मुलभूत सुविधांसाठी खर्च करायचा असतो*. *पण कुक्कडगावात तर ग्रामसभा कागदावरच घेण्यात आली, आणि निधी परस्पर उचलून घेतल्याचा स्पष्ट संशय आहे. तक्रारी करूनही कुठलीही तपासकारवाई करण्यात आलेली नाही*.”
*निधी हरवला आहे… आता पोलिसात मिसिंग कंप्लेंट करावी लागेल का?’ — ग्रामस्थांचा कडवा सवाल*
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. निधीचा पत्ता लागत नसल्याने हा विषय आता उपरोधाने चर्चेत आला असून गावकऱ्यांनी धक्कादायक प्रश्न उपस्थित केला आहे—
*गावचा वित्त आयोगाचा निधी पूर्णतः बेपत्ता आहे. अधिकारी तपास करीत नाहीत. तर मग पोलिस स्टेशनमध्ये ‘मिसिंग कंप्लेंट’ दाखल करावी लागेल का*?”
*गावकऱ्यांचा हा उपरोधिक सवाल प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सरळ बोट ठेवणारा आहे*.
*ग्रामपंचायतीकडून ‘हिशोब तपासणी चालू आहे एवढेच उत्तर*
या गंभीर आरोपांवर ग्रामपंचायत कार्यालयाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली असून, केवळ “हिशेब तपासात आहे” एवढेच उत्तर देण्यात येत आहे.
यामुळे ग्रामस्थांच्या शंका अधिकच गडद होऊ लागल्या आहेत.
ऑडिट, हिशोब पारदर्शक वाचन आणि जबाबदारांवर कारवाईची मागणी
सोपानराव गायकवाड यांनी आता पुढील पायऱ्या उचलत या प्रकरणी विस्तृत तक्रार तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये खालील प्रमुख मागण्या असणार आहेत—
*वित्त आयोगाच्या निधीचा संपूर्ण ऑडिट तपास*
*ग्रामसभेत खर्चाचे पारदर्शक वाचन*
*गैरव्यवहार आढळल्यास जबाबदारांवर गुन्हे नोंदवण्याची मागणी*
*निधी परस्पर काढला असल्यास फिर्यादी म्हणून कारवाई सुरू करणे*
*निधी नेमका कुठे गेला? गाव प्रतीक्षेत—तपास मात्र सुरूच नाही*
निधी प्रत्यक्षात वापरण्यात आला, की अन्यत्र वळविण्यात आला, की खरोखरच गायब झाला—याबाबतचा कोणताही खुलासा पंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हाधिकारी पातळीवरून अद्याप झालेला नाही.
गावकऱ्यांच्या वारंवार तक्रारी, अधिकाऱ्यांचे मौन, आणि निधीच्या छायाही न सापडल्याने कुक्कडगावात आता एकच चर्चा रंगली आहे—
*वित्त आयोगाचा निधी हरवला… शेवटी पोलिसात मिसिंग तक्रार करायची वेळ येणार का*?”
गावकऱ्यांच्या या प्रश्नाचे उत्तर प्रशासन देणार का, की हा निधी इतरच कुठल्या मार्गाने गेला…?
हे स्पष्ट होईपर्यंत कुक्कडगावचे ग्रामस्थ प्रतीक्षेत, आणि संशयमुक्त उत्तराची वाट पाहत आहेत.