राजेवाडी शाळेतर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जनजागृती फेरी
जालना/प्रतिनिधी/ “जागर बदलाचा, समृद्ध महाराष्ट्राचा” या संकल्पनेवर आधारित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतर्फे भव्य जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. गावातील नागरिकांना या अभियानाचे महत्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध घोषणाबाजी करत, फलक हातात घेऊन गावभर परिक्रमा केली.
फेरीदरम्यान स्वच्छता, साक्षरता, आरोग्य, ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन, तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांबाबत माहिती देत ग्रामस्थांना जागरूक करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि संदेश देण्याची पद्धत पाहून गावकरीही कौतुकाने त्यांना पाठिंबा देत होते.
या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक जगत घुगे यांनी अभियानाचे उद्दिष्ट सांगत ग्रामविकासात नागरिकांच्या सक्रीय सहभागाची गरज प्रतिपादन केली. शालेय समितीचे अध्यक्ष रंजित शेजुळ मा सरपंच प्रतापसिंग गुसिंगे उपाध्यक्ष प्रतापसिंग डेहगंळ, सदस्य ज्योती घुणावत, ग्रामपंचायतचे ग्रामपंचयातअधिकारी श्रीमती मेहत्रे, तसेच गावातील मान्यवर नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सहशिक्षक श्री परमेश्वर मोरे, श्रीमती वनिता आचार्य, श्रीमती गंगा टेपले, श्रीमती प्रज्ञा चौधरी, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागातील महिला कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी झाले.