कुक्कडगांवचे धरणग्रस्त शेतकरी अडचणीत
पुल वाहून, रस्ता ठप्प—“आमची शेती, आमचा हक्क कुठे गेला?” संतप्त प्रश्न
अंबड/प्रतिनिधी/ कुक्कडगांव सुखापूरी धरणाच्या उभारणीत जमीन गमावलेल्या धरणग्रस्त शेतकऱ्यांवर आता आणखी एक संकट कोसळले आहे. शिल्लक राहिलेल्या थोड्याशा जमिनीची मशागत करण्यासाठी वापरला जाणारा मुख्य रस्ता आणि पुल अतिवृष्टीत वाहून गेल्याने शेती करणे, माल वाहतूक करणे आणि दैनंदिन शेतीकाम करणे अशक्यप्राय झाले आहे. पाटबंधारे विभागाने जमीन अधिग्रहण करताना दिलेली मोठमोठी आश्वासने आता पूर्णपणे पोकळ ठरल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
धरणामुळे मोठा भूभाग पाण्याखाली गेला. अनेक शेतकरी अल्पभूधारक बनले; काहींच्या नावावर तर फक्त काही गुंठ्यांची जमीन उरली. या उरलेल्या जमिनीवर शेती करून जगण्याशिवाय पर्याय नाही. पण या जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी एकमात्र असलेला रस्ता आणि पुल वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा रोजचा उदरनिर्वाहच प्रश्नचिन्हात आला आहे.
धरणकाठचा हा मार्ग वर्षानुवर्षे दुरुस्तीअभावी खस्ता खात होता. यावर्षीच्या मुसळधार पावसात पुल वाहून गेल्यानंतर शेतकऱ्यांचे हाल अक्षरशः बिकट झाले आहेत. मातीचे ढिगारे, खोल चिखल आणि खड्ड्यांनी भरलेला मार्ग ओलांडणे म्हणजे धोका पत्करणे. लहान वाहने तर सोडाच, बैलगाडीदेखील अडकून पडतात; शेतकरी पायी जाण्यासाठी सुद्धा दोन पट वेळ घालवत आहेत.
या मार्गावरूनच ऊस, कापूस, मोसंबी, सोयाबीन, मुग, बाजरी आणि सुखापूरी बाजारपेठेत जाणारा भाजीपाला वाहतूक केला जातो. रस्ता उद्ध्वस्त झाल्याने शेतमाल बाजारपेठेत वेळेवर पोहोचत नाही; त्यात होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या कमरावर आणखी मोठा ताण देत आहे.
*धरणग्रस्त शेतकऱ्यांचे संतापाने भरलेले वक्तव्य विचारात पाडणारे आहे*
*आम्ही आमच्या जमिनी धरणात दिल्या*… *त्या वेळी आम्हाला विकासाची*, *रस्त्याची*, *सुविधांची मोठी आश्वासने दिली*. *पण आता समस्यांना आम्ही ओरडूनही पाटबंधारे विभागाची नजर आमच्याकडे जातच नाही*! पाटबंधारे विभागावर वरून हात असल्याने आमच्या वेदना कोणालाच दिसत नाहीत.”
ग्रामस्थांनी प्रशासनासमोर स्पष्ट मागणी ठेवली आहे—
वाहून गेलेला रस्ता तातडीने दुरुस्त करावा,
पुलाची पुनर्बांधणी करावी,
धरण परिसरासाठी कायमस्वरूपी मजबूत आरसीसी रस्ता करावा.