प्रति, माननीय संपादकजी
विषय:- कलाल-कलार समाजाचे भगवान सहस्त्रार्जुन आर्थिक विकास महामंडळाचे घोडे कुठे अडले!
राज्यात काही समाजांनी कोणताही संघर्ष न करता त्यांना तडकाफडकी आर्थिक विकास महामंडळ प्राप्त झाले यांचेही आम्ही स्वागत करतो. कारणं यामुळे समाजाचा विकास होईल मग तो कोणताही समाज असो.परंतु गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना आर्थिक विकास महामंडळासाठी संघर्ष करीत आहे व शासन दरबारी मागणी करीत आहे परंतु सरकार यावर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.कलाल-कलार समाजाला भगवान सहस्त्रार्जुन आर्थिक विकास महामंडळ मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथराव शिंदे,अतुलजी सावे यांना लेखी निवेदन सुध्दा देण्यात आले. सोबतच इतरही मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आणि याबद्दल चर्चा सुध्दा झाली व त्यांनी ठोस आश्वासन सुध्दा दिले तुमच्या समाजाचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे कलाल- कलार समाजासाठी भगवान सहस्त्रार्जुन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल.परंतु सरकार तर्फे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत कारवाई किंवा हालचाली अजून पर्यंत सरकार मार्फत करण्यात आलेली नाही याची खंत व दु:ख समाजाला आहे. समाजाने मंत्री महोदयांना समक्ष निवेदन दिलेच सोबतच मेल व्दारे अनेक पत्र व्यवहार सुध्दा केले परंतु कलाल-कलार समाजाच्या हाती निराशा आली.एककीकडे सरकार कलाल-कलार समाजाला आर्थिक विकास महामंडळापासुन डावलत आहे तर दुसरीकडे सरकारने जाहीर केलेल्या समाजाचे आर्थिक विकास महामंडळ समाजाच्या विकासासाठी कार्य करीत आहे.याची आम्हाला खंत वाटते. कोणताही समाज असो प्रत्येक समाजाचा विकास व्हायलाच पाहिजे.यासाठी महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना नेहमीच स्वागतच करीत आली आहे.सरकारने ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले याचे स्वागतच.या महामंडळाचे अध्यक्ष आशिषजी दामले महामंडळाच्या माध्यमातून समाजासाठी काय-काय करता येईल यावर गांभीर्याने विचार करून समाजाच्या प्रती विकासाची गती वाढविण्याचे काम करीत आहेत.दिनांक २२ जून २०२५ ला कराड येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सभेत त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवन उभारण्याची घोषणा केली सोबतच पारंपरिक व्यवसाय (पौरोहित्य )करणाऱ्यांना संधी देण्याकरिता पुढील पाऊल उचलण्याचे त्यांनी जाहीर केले.दामलेंच्या कार्याचे आम्ही स्वागत करतो कारण ते समाजाला पुढे नेण्याचे कार्य करीत आहेत.हीच संधी महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेला सरकार का देत नाही? आम्हालाही वाटते की प्रत्येक जिल्ह्यात भगवान सहस्त्रार्जुन भवन बनावे व याचा फायदा समाजातील तळागाळातील गरीब समाज बांधवांना व्हावा.परंतु कलाल-कलार समाजाच्या प्रती सरकारचे घोडे कुठे अडले अजुन पर्यंत समजले नाही! आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीत पहिला हक्कदार कलाल-कलार समाज होता.परंतु सरकारने आर्थिक विकास महामंडळापासुन डावलल्याने समाज विकासापासुन दुरावल्या जात आहे.आज कलाल-कलार समाज अत्यंत मागासलेला आहे.कारण पारंपारीक व्यवसायांचा विचार केला तर फक्त १ टक्का पारंपरिक (मद्य) व्यवसाय आमच्या समाजाजवळ आहे व ९९ टक्के व्यवसाय पुंजीपती लोकांजवळ आहे त्यामुळे समाज पारंपरिक व्यवसायापासुन आजही कोसो दूर आहे.परंतु आज ९९ टक्के समाज बांधवांचे काय होईल याचा विचार सरकारने केला पाहिजे.समाजाच्या व्यथा आम्ही मंत्रीमहोदयांना समक्ष सांगितल्या सोबतच अनेक निवेदने सुध्दा दिलेत परंतु सरकार कलाल-कलार समाजाच्या प्रती उदासीन असल्याचे दिसून येते यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या जात आहे. आताही वेळ गेलेली नाही सरकारने कलाल-कलार समाजाच्या व्यथा समजून घ्याव्यात व इतर समाजाप्रमाणे कलाल-कलार समाजासाठी भगवान सहस्त्रार्जुन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून समाजाला विकासाच्या प्रवाहात आणावे अशी मागणी महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना करण्यात येत आहे.माननीय देवेन्द्रजी फडणवीस अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत यामध्ये मुख्यत्वेकरून आणिबाणीच्या काळातील बंदिवानांची पेंशन दुप्पट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे याचे स्वागतच याच धर्तीवर कलाल-कलार समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण एक पाऊल पुढे टाकुन कलाल-कलार समाजासाठी भगवान सहस्त्रार्जुन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून समाजाचा विकासाचा मार्ग मोकळा करावा अशी आग्रहाची विनंती संघटनेच्या वतीने सरकारला करण्यात येत आहे.
-रमेश लांजेवार
