Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादवारकरी संत साहित्य संमेलनात रंगणार ‘कीर्तवणी’ वारकरी संप्रदायाच्या 'आडवाटंच्या विठोबाची' कथा 'किर्तावनी'तून उलगडणार!

वारकरी संत साहित्य संमेलनात रंगणार ‘कीर्तवणी’ वारकरी संप्रदायाच्या ‘आडवाटंच्या विठोबाची’ कथा ‘किर्तावनी’तून उलगडणार!

वारकरी संत साहित्य संमेलनात रंगणार ‘कीर्तवणी’

वारकरी संप्रदायाच्या ‘आडवाटंच्या विठोबाची’ कथा ‘किर्तावनी’तून उलगडणार!

जालना/ मराठी संस्कृतीचे मूलाधार असलेल्या वारकरी संप्रदायाचा केवळ भावनिक आणि भक्तीमय पैलूच नव्हे, तर त्याचा सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विचारधारेवरील सखोल प्रभाव यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम जालना शहरात होत आहे.

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जेईएस महाविद्यालयात दि. १३ आणि १४ डिसेंबर २०२५ रोजी वारकरी संत साहित्य संमेलनाचे आयोजन जगतगुरू द्वाराचार्य विद्यावाचस्पती रामकृष्णदास लहावितकर  यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. या संमेलनात रसिकांचे लक्ष वेधून घेणारे सादरीकरण म्हणजे ‘हिमशिखा, पुणे’ निर्मित ‘किर्तावनी’ हा विशेष संगीत-नाट्यप्रयोग. हा प्रयोग पहिल्याच दिवशी, शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे.

‘किर्तावनी’: परंपरा आणि आधुनिकतेचा संवाद

‘किर्तावनी’ हे केवळ नाटक नसून, महाराष्ट्रातील दोन प्रमुख लोककला – कीर्तन आणि लावणी-बतावणी – यांचा सर्जनशील मिलाफ आहे. या प्रयोगातून ‘वारी आडवाटंच्या विठोबाची’ कथा मांडली जाते. वारकरी संप्रदायाला वरपांगी जितकं भावव्याकूळ मानलं जातं, त्याहून कितीतरी पटीने तो ‘डोळ्यात अंजन घालणारा’ आणि ‘सर्वव्यापी’ आहे, हे या सादरीकरणातून स्पष्ट होते.

यातून विचारांची नवी मांडणी करण्यात आली आहे.  संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापासून ते आधुनिक काळात विठ्ठलमंदिर प्रवेशासाठी लढणारे साने गुरुजी यांच्यापर्यंतच्या विचारांचा मागोवा या सांगितिक प्रवासात घेण्यात आला आहे. भक्ती आणि परमार्थापलीकडे जाऊन, संतसाहित्याने महाराष्ट्राला दिलेली सामाजिक दिशा आणि या सगळ्याचा आपल्या वर्तमान जीवनावर काय परिणाम होतो, याचा विचार ‘किर्तावनी’तून नव्याने मांडण्यात आला आहे.

लोकसंगीताचे वैभव: सलग पावणेदोन तासांच्या या प्रयोगात नाट्य, कथाकथन, निवेदन आणि गायनाच्या माध्यमातून लावणी, सवाल-जवाब, कटाव, अभंग, भारुड, कव्वाली, पोवाडा अशा बहुविध लोककला प्रकारांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.

या प्रयोगाचे लेखन-दिग्दर्शन: ऋचिका खोत यांचे अभिनय  ऋचिका खोत आणि स्वामीराज भिसे

या संमेलनात सहभागी होऊन वारकरी संप्रदायाच्या या बहुआयामी आणि लक्षवेधी सादरीकरणाचा अनुभव घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments