यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा
दीक्षांत समारंभ फेब्रुवारी २६ च्या प्रथम आठवड्यात
विद्यार्थ्यांना मराठीतील नाव पडताळणीचे आवाहन
नाशिक/प्रतिनिधी/ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१ वा दीक्षांत समारंभ येत्या फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी येत्या २८ डिसेंबर २०२५ पर्यंत विद्यापीठाकडे नोंदवलेल्या आपल्या मराठी नावाची पडताळणी करण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
डिसेंबर २०२४. फेब्रुवारी / मार्च २०२५ आणि मे / जून २०२५ या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर मराठी भाषेतील (देवनागरी लिपी) त्यांचे नाव अचूक यावे याकरीता नावाची पडताळणी व दुरुस्तीकरीता विशेष सुविधा विद्यापीठामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रवेश अर्ज भरतेवेळी काही विद्यार्थी आपल्या नावाची मराठीतील नोंद अचूक करीत नाहीत, असे विद्यापीठाच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार संबंधित विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर त्यांच्या मराठीतील नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी नाव पडताळणी व दुरुस्तीचे अभियान विद्यापीठामार्फत राबविण्यात येत आहे. उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांना दीक्षांत सोहळ्यात देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रासाठी आपले मराठी नाव पडताळणी आणि दुरुस्तीची सुविधा विद्यापीठाच्या https://31convocation.ycmou.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळास भेट देवून आपले मराठी नाव तपासून त्यात काही दुरुस्ती असल्यास ती येत्या दिनांक २८ डिसेंबर २०२५ पर्यंत करावी. तसेच विद्यार्थ्यांनी आपले मराठी नाव दुरुस्ती न केल्यास भविष्यात त्यांच्या प्रमाणपत्रावरील मराठीतील नाव दुरुस्तीसाठी विद्यापीठामार्फत शुल्क आकारण्यात येईल. त्यामुळे संबंधित सर्व विद्यार्थांनी दिलेल्या मुदतीत विद्यापीठ संकेतस्थळास भेट देऊन आपल्या पदवी प्रमाणपत्रावरील मराठी नावाचा तपशील अचूक असल्याची खात्री करावी व आवश्यक असल्यास त्यात योग्य ती दुरुस्ती करावी. या संदर्भात काही अडचण असल्यास (०२५३) २२३०७३४ या दूरध्वनी क्रमांकावर व sfc@ycmou.ac.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे आणि परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.
