विश्व विजयापासून एक पाऊल दूर
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपान्त्य फेरीत भारताने इंग्लंडला 7 धावांनी हरवून अंतिम फेरीत धडक मारली आणि सलग दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचण्याची करामत केली. अर्थात भारताला हा विजय सहज मिळाला नाही हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. अतिशय रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात इंग्लंडने भारताला जशास तसे उत्तर देऊन 145 कोटी जनतेच्या हृदयाचे ठोके वाढवले. बुधवारी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला सहज हरवत अंतिम फेरी गाठली अंतिम सामन्यात त्यांच्या सोबत कोण खेळणार याचे उत्तर गुरुवारच्या सामन्यातून मिळणार होते त्यामुळे सर्वांची नजर टीव्ही कडे लागली होती. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. प्रथम गोलंदाजी घेऊन भारताला लवकरात लवकर बाद करण्याचा त्याचा मनसुबा होता त्याचा हा मनसुबा काही प्रमाणात यशस्वी होताना दिसला. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला पण दुसरा सलामीवीर आणि महत्वाच्या क्षणी फॉर्मात आलेल्या यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने त्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्याने या सामन्यातही तडाखेबंद फलंदाजी करत 89 धावा तडकावल्या. त्याला ईशान किशन, शिवम दुबे याने चांगली साथ दिली. हार्दिक पांड्या, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनीही छोट्या पण महत्वाच्या खेळी केल्याने भारताने 20 षटकात 253 धावा काढल्या. टी 20 विश्वचषकात सलग दोनदा अडीचशे धावांचा टप्पा ओलांडणारा भारत हा जगातला पहिला संघ ठरला. उपान्त्य फेरीसारख्या निर्णायक सामन्यात अडीचशे धावांचा पाठलाग करणे सोपे नसते त्यामुळे भारत हा सामना सहज जिंकेल असा कयास बांधला जात होता. सर्वांनाच तसे वाटत होते मात्र इंग्लंडच्या फलंदाजांच्या मनात वेगळेच होते. त्यांचा सलामीचा फलंदाज फील सॉल्ट आणि कर्णधार हॅरी ब्रुक्स स्वस्तात बाद झाले पण युवा जेकब बेथेल ने हार मानली नाही. एकीकडे समोरचे फलंदाज बाद होत असताना त्याने एकबाजू लावून धरली ती ही तडाखेबंद फलंदाजी करत. फलंदाज जरी बाद होत असले तरी त्यांनी जवळपास बाराच्या सरासरीने धावा काढणे सुरूच ठेवले त्यामुळेच सतराव्या षटकापर्यंत सामना इंग्लंडच्या आवाक्यात होता मात्र 18 व्या षटकात बुमराने अवघ्या सहा धावा देऊन सामना भारताच्या बाजूने झुकवला. पुढच्याच षटकात हार्दिक पांड्याने त्याची पुनरावृत्ती केली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. या दरम्यान जेकब बेथेल याने आपले शतक पूर्ण केले पण त्याचे शतक व्यर्थ्य गेले आणि भारत अंतिम फेरीत पोहचला. भारताच्या या विजयाचे शिल्पकार संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमरा ठरले. संजू सॅमसनला सामन्याचा मानकरी पुरस्कार मिळाला पण त्याने मोठ्या मनाने जसप्रीत बुमरा हा या पुरस्काराचा खरा मानकरी असल्याचे कबूल केले. या विजयासोबतच भारताने विश्व विजयाकडे आणखी एक दमदार पाऊल टाकले. भारत आता विश्व विजयापासून अवघे एक पाऊल दूर आहे. जर भारतीय खेळाडूंनी आपल्या क्षमतेनुसार खेळ केला आणि नशिबाने साथ दिली तर भारत हे एक पाऊल पार करून सलग दुसऱ्यांदा आणि आणि एकुणात तिसऱ्यांदा आणि ते ही घरच्या मैदानावर टी 20 विश्वचषकावर नाव कोरून इतिहास रचू शकतो. अंतिम फेरीसाठी भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा!
-श्याम ठाणेदार
