Sunday, March 29, 2026
Homeऔरंगाबादवीज खांब, रोहित्रांवरील बॅनर, केबल हटवा; नसता गुन्हे दाखल करू : महावितरण

वीज खांब, रोहित्रांवरील बॅनर, केबल हटवा; नसता गुन्हे दाखल करू : महावितरण

वीज खांब, रोहित्रांवरील बॅनर, केबल हटवा; नसता गुन्हे दाखल करू : महावितरण

छत्रपती संभाजीनगर :- शहरात वीज खांब, रोहित्रांसह महावितरणच्या यंत्रणेवर अनधिकृतरीत्या बॅनर, पोस्टर, होर्डिंग तसेच केबल टाकण्याचे प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्यात अडथळा तसेच अपघाताचा धोका निर्माण होत आहे. येत्या चार दिवसांत हे साहित्य स्वत:हून काढून घ्यावे; नसता संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा महावितरणने दिला आहे.

शहर व परिसरातील विविध भागांत महावितरणच्या मालकीचे  विजेचे खांब, रोहित्र (ट्रान्सफॉर्मर), वितरण पेट्या, विद्युत वाहिन्या व इतर विद्युत संरचनांवर अनधिकृतरीत्या बॅनर, पोस्टर, होर्डिंग लावणे तसेच केबल टाकण्याचे प्रकार आढळून आले आहेत. ही कृती कायद्याचे उल्लंघन असून सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणारी आहे. तांत्रिक दोषामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी  महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दिवसाच नव्हे तर रात्रीही वीज खांबावर चढावे लागते. रोहित्रातील बिघाड शोधून दुरुस्त करावा लागतो. केबल व बॅनरबाजीमुळे महावितरणच्या दुरुस्तीतच अडथळा निर्माण होत आहे. इतकेच नव्हे तर, अनेक ठिकाणी बॅनरमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे निदर्शनास आले आहे. रोहित्रे तसेच वीजपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या डीपीवर (डबल पोल) बांधलेले बॅनर हवेच्या दबावामुळे एका बाजूने फाटतात. नंतर ते वीजवाहिन्यात अडथळा निर्माण करतात. लावलेल्या बॅनर, पोस्टर व होर्डिंगमुळे कर्मचाऱ्यांना खांबावर चढता येत नाही.

शहरात अनेक ठिकाणी विद्युत खांबांवर टीव्ही व इंटरनेटच्या केबल अनधिकृतपणे टाकलेल्या आहेत. यामुळे वीजपुरवठ्यात अडथळा निर्माण होत आहे. केबल व पोस्टरबाजीमुळे वीज कर्मचाऱ्यांना प्राणांतिक वा अप्राणांतिक अपघात होण्याची शक्यता असते. अनधिकृतरित्या लावण्यात आलेले सर्व बॅनर, पोस्टर, होर्डिंग तसेच खांबावर टाकण्यात आलेल्या केबल्स संबंधित व्यक्ती, संस्था, संघटना, राजकीय पक्ष, मंडळे, केबल ऑपरेटर यांनी येत्या चार दिवसांत (28 फेब्रुवारीपर्यंत) स्वखर्चाने काढून घ्यावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे. अन्यथा संबंधितांविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम-2003 तसेच इतर लागू कायदे व नियमांन्वये फौजदारी गुन्हा नोंदवून दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्युत संरचनांवर अनधिकृत हस्तक्षेप करणे, संरचनांचे नुकसान करणे किंवा त्यावर कोणतीही वस्तू लावणे हा दंडनीय अपराध असून त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी कायद्याचे पालन करून तत्काळ सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments