अहमदाबाद विमान अपघातातील मयतांना
नोटरी असोसिएशनची भावपूर्ण श्रद्धांजली
जालना/प्रतिनिधी/ अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात प्राणास मुकलेल्या निष्पाप प्रवाशांच्या स्मृतीप्रित्यर्थ नोटरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अँड गोवातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित सर्वांनी दुःख व्यक्त करत मृतात्म्यास शांततेसाठी प्रार्थना केली.
यावेळी नोटरी असोसिएशनचे महाराष्ट्र व गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली म्हणाले की, प्रत्येक अपघात ही केवळ एक घटना नसते, ती शेकडो आयुष्यांवर, स्वप्नांवर आणि कुटुंबांवर कोसळलेला एक आघात असतो. त्या अपघातातील प्रत्येक व्यक्ती मागे अपुरे राहिलेले अनेक नाते, अनेक स्वप्ने, आणि अनेक जबाबदाऱ्या ठेवून गेली आहे. त्यांचा आक्रोश, त्यांचे शून्य झालेलं अस्तित्व, आपल्याला काळजाला भिडणारा संदेश देत आहे. आज आपण संवेदनशील नागरिक म्हणून या वेदनेला सामोरे जात आहोत. प्रत्येक धर्म, जात, पंथ हे विसरून, आपण सर्वांनी त्या आत्म्यांसाठी प्रार्थना करावी, त्यांच्या कुटुंबियांसाठी मनापासून सहवेदना व्यक्त करावी. अशा वेळी, शब्द कमी पडतात. पण प्रार्थना मात्र नेहमी प्रभावी ठरते. आपण सर्वजण निःस्वार्थपणे प्रार्थना करूया की, त्या सर्व आत्म्यांना शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखाचा सामना करण्याची शक्ती लाभो.
जालना जिल्हा नोटरी असोसिएशनचे कार्याध्यक्ष ॲड. महेश धन्नावत म्हणाले की, या अपघातामुळे अनेक कुटुंबांमध्ये कायमचा अंधार पसरला आहे. त्या वेदना शब्दात सांगता येणार नाहीत. आपण समाज म्हणून त्यांच्यासोबत आहोत, ही भावना त्यांच्यासाठी खंबीर आधार ठरेल. आपण त्यांच्या आठवणी जपत त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो यासाठी प्रार्थना करूया, असे ते म्हणाले.
यावेळी ॲड. अशोक छाजेड, ॲड. आर. बी. मोरे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.