सर्व विभागांनी ग्रामिण भागात समन्वयाने
छत्रपती संभाजीनगर, दि.13 (जिमाका)- आशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविका ह्या गावा गावात शासनाच्या सेवेच्या दूत आहेत. महिला बालविकास विभाग, आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग अशा विविध विभागांनी एकमेकांशी समन्वय राखून ग्रामिण भागातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवाव्या असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ‘स्माईल ट्रेन’ या संस्थेच्या वतीने दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात व्यंगावरील उपचाराविषयी माहिती व मार्गदर्शनपर आशा कार्यकर्त्यांचा मेळावा मंथन सभागृह, एमआयटी विद्यालय येथे आयोजित केला होता. यामेळाव्यास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित,पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, विषय तज्ज्ञ डॉ. रमाकांत बेंबडे, जिल्हा माताबाल आरोग्य अधिकारी डॉ.विशाल बेंद्रे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत बडे, बालरोग तज्ञ डॉ.सोनखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात लहान मुलांमधील विविध आजार, कुपोषण कार्यक्रम, संदर्भ सेवा, जन्मजात व्यंगांवर तातडीने करावयाच्या उपाययोजना व उपचार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर्सनी मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, जन्मजात व्यंगामुळे बालकांचे विद्रुपीकरण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होतो. मात्र वेळीच उपचार केले तर त्याच्या आयुष्यात त्याचे हास्य, आत्मविश्वास त्यास परत मिळवून देता येऊ शकतो. आशा वर्कर्सने , अंगणवाडी सेविकांनी आपापल्या भागात असलेली बालके शोधून त्यांच्या पालकांना इकडे संदर्भित करावे व त्यांच्यावर मोफत उपचार करुन घ्यावे. हे पुण्याचे काम आहे.
प्रास्ताविक डॉ. अभय धानोरकर यांनी केले. डॉ. बेंबडे यांनी विषयनिहाय मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिल्हाभरातील आशा सेविका उपस्थित होत्या.
