वाहतूक कोंडी मोठी समस्या
रस्त्यांवरील वाढती वाहतूक कोंडी ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. दिवस असो की रात्र, वेळ कोणतीही असो रस्ता कोणताही असो मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई किंवा मुंबईतून कुठेही जाणारे राज्य – राष्ट्रीय महामार्ग सगळीकडे प्रचंड वाहतूक कोंडी दिसते. पूर्वी हे चित्र शनिवार, रविवार किंवा जोडून सुट्ट्या आलेल्या दिवशी व्हायची आता ती रोजच होती. या वाहतूक कोंडीने रस्त्यांवर वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या असतात त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ज्या प्रवासास पूर्वी एक ते दीड तास लागायचा त्याच प्रवासासाठी नागरिकांचा आता दुप्पट वेळ लागत आहे. सकाळ, संध्याकाळ यासारख्या पीक अवरमध्ये तर वाहने अगदी कासव गतीने धावतात. वाढत्या वाहन कोंडीमुळे शहरातील नागरिक त्रस्त आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शासनाने उड्डाणपूल केले पण आता त्याच उड्डाणपुलावर वाहनांची कोंडी होताना दिसत आहे. अनेक प्रयत्न करूनही वाहतूक कोंडी कमी करण्यात प्रशासनाला यश येत नाही. वाढत्या वाहतूक कोंडीला अनेक कारणे आहेत त्यातील मुख्य कारण आहे ते म्हणजे वाहनांची वाढती संख्या. वाढत्या वाहतूक कोंडीला वाहनांची प्रचंड संख्या जबाबदार आहे. आज लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक आहे. दरवर्षी त्यात हजारो वाहनांची भर पडते. वाढत्या वाहनांमुळे शहरातील रस्ते अपुरे पडू लागली आहे. वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली तशीच पार्किंगचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुंबईत गाड्या पार्क करण्यासाठी जी वाहनतळे आहेत त्यात साधारणपणे दहा हजारांच्या आसपास वाहने पार्क करता येतात परिणामी अवैध पार्किंगची संख्या वाढली आहे. पार्किंगची सोय नसल्याने नागरिक रस्त्यांच्या कडेला आपल्या गाड्या पार्क करतात त्यामुळेही वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शासन, प्रशासनाकडून नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र नागरिकांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. बेस्ट, पीएमपीएल यासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नागरिकांना सक्षम सेवा देण्यात अपयशी ठरत आहे म्हणून जो तो नवीन वाहन घेत आहे. नवीन वाहन विकत घेऊन नागरिक आपल्या खाजगी वाहनांनी प्रवास करत आहे. बेस्ट, पीएमपीएल सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने आपला कारभार सुधारून नागरिकांना चांगली सेवा द्यायला हवी. बेस्ट, पीएमपीएल सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची जबाबदारी शासनाची आहे. शासनाने जर या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केल्या तर नागरिक स्वतःच्या वाहनांनी प्रवास न करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच वापर करतील त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल आणि वाहनाची संख्या कमी झाली की रस्त्यांवरील वाहतूक कोंडी देखील कमी होईल. जर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याची शासन प्रशासनाची मनापासून इच्छा असेल तर त्यांनी आधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करूनच वाहतूक कोंडी रोखता येईल.
-श्याम ठाणेदार