Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादवसंत पंचमी : ज्ञान,संस्कृती आणि नवचैतन्याचा उत्सव 

वसंत पंचमी : ज्ञान,संस्कृती आणि नवचैतन्याचा उत्सव 

वसंत पंचमी : ज्ञान,संस्कृती आणि नवचैतन्याचा उत्सव 
      भारतीय संस्कृतीत ऋतूंना विशेष महत्त्व आहे.प्रत्येक ऋतू मानवाच्या जीवनात नवी ऊर्जा,नवा विचार आणि नवे संस्कार घेऊन येतो.अशाच ऋतूंपैकी वसंत ऋतूची सुरुवात करणारा पवित्र सण म्हणजे वसंत पंचमी.यावर्षी २३ जानेवारी २०२६ रोजी वसंत पंचमी संपूर्ण देशभर श्रद्धा,उत्साह आणि सांस्कृतिक वातावरणात साजरी होत आहे.
वसंत पंचमी हा सण ज्ञान,विद्या,कला आणि सर्जनशीलतेची देवी माँ सरस्वतीच्या उपासनेचा दिवस म्हणून ओळखला जातो.पांढऱ्या वस्त्रांत विराजमान असलेल्या सरस्वती देवीच्या हाती विणा,ग्रंथ आणि माळ असते—जी मानवाला ज्ञान,शिस्त आणि विवेकाचा मार्ग दाखवते.या दिवशी विद्यार्थ्यांकडून पुस्तके,वही, लेखणी यांचे पूजन करून विद्येप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.वसंत ऋतू येताच निसर्गात नवचैतन्य संचारते.झाडांना नवी पालवी फुटते,फुलांमध्ये रंग भरतो,शेतशिवार हिरवेगार दिसू लागते.रानात,बागेत आणि शेतात फुलणारी पिवळी फुले व मोहरीची पिके वसंत पंचमीचे प्रतीक मानली जातात.म्हणूनच या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे.पिवळा रंग आनंद,समृद्धी,आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो.वसंत पंचमीचा सण केवळ धार्मिक नसून तो सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे.अनेक ठिकाणी या दिवशी शाळा,महाविद्यालये,ग्रंथालये आणि कला संस्थांमध्ये सरस्वती पूजन,सांस्कृतिक कार्यक्रम, काव्यसंमेलने,संगीत व नृत्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.लहान मुलांचे शिक्षण सुरू करण्याचा शुभ मुहूर्त म्हणूनही हा दिवस मानला जातो.आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात वसंत पंचमी आपल्याला ज्ञानाचा आदर,विचारांची शुद्धता आणि संस्कृतीची जपणूक यांची आठवण करून देते.केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे,तर जीवनमूल्ये,सदविचार आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा सण आहे.
वसंत पंचमी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे,अज्ञानातून ज्ञानाकडे आणि निराशेतून आशेकडे नेणारा उत्सव.या पवित्र दिवशी प्रत्येकाने माँ सरस्वतीच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या जीवनात ज्ञान,सदबुद्धी आणि सदाचार नांदावा अशी प्रार्थना करणे हीच या सणाची खरी भावना आहे.
-गणेश मच्छिंद्र सपकाळ
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments