वेरूळच्या नाथ आश्रमात रामनवमीचा उत्साह; संगीतमय नवनाथ कथेचे ध्वजारोहण संपन्न
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील श्रीक्षेत्र वेरूळ येथील श्री नाथ आश्रमात रामनवमीचा सण अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगल दिनाचे औचित्य साधून आश्रमात आगामी ‘संगीतमय नवनाथ कथा’ सोहळ्याचे भव्य ध्वजारोहण संत-महंतांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. २ ते ९ एप्रिल दरम्यान रंगणार नवनाथ कथा नाथ आश्रमाच्या मठाधिपती सद्गुरु अक्काताई महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या २ एप्रिल ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत भव्य संगीतमय नवनाथ कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून २६ मार्च रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर कथेच्या ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी टाका आश्रमाचे प्रमुख श्री विद्या वामदेवतिर्थ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. मर्यादा पुरुषोत्तमाचा आदर्श जपण्याचे आवाहन ध्वजारोहण प्रसंगी भाविकांना संबोधित करताना सद्गुरु अक्काताई महाराज म्हणाल्या की, “प्रत्येक व्यक्तीने प्रभू श्रीरामचंद्रांच्या आदर्शांचे अनुकरण करून जीवन जगले पाहिजे. शांतता, संयम आणि मर्यादा यांचे पालन केल्यास जीवन मंगलमय होते.” देव, देश आणि धर्माची सेवा करण्याचा संदेश देत त्यांनी प्रामाणिकपणा व कष्टाची साथ धरण्याचे आवाहन केले, जेणेकरून प्रभू रामाचा आशीर्वाद कायम पाठीशी राहील. मान्यवरांची उपस्थिती व महाप्रसाद या सोहळ्याला अभियंता इंजि. अतुल चव्हाण पाटील, भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, प्रकाश वाकळे, वेरूळचे सरपंच प्रकाश पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. २ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवनाथ कथेचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आश्रम प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
