वेरुळ लेणी परिसरातील ए.टी.एम. फोडले, चोरट्यांचे खुलताबाद पोलिसांसमोर आव्हान
चोरट्यांनी १६ लाखांसह अख्ख एटीएम नेलं उखडून!
खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद-तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे भेट देणारया पर्यटकांच्या सोयीसाठी एस.बी.आय. बँक ने जगप्रसिद्ध वेरुळ लेणीसमोरील कैलास हॉटेलच्या शेजारी एटीएम उपलब्ध करून दिले होते. सदरील ए.टी.एम. बुधवारी (ता. १०) पहाटेच्या सुमारास या अज्ञात चोरट्यांनी तोड फोड करीत धाडसी चोरी केली असून, चोरट्यांनी चक्क संपूर्ण एटीएम यंत्रच उखडून नेले.
या एटीएममधून तब्बल १६ लाख रुपये लांबविल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून श्वान पथक व ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या धाडसी चोरीमुळे खुलताबाद पोलीसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
वेरुळ लेणीतील प्रवेश द्वाराजवळच तात्पुरत्या स्वरुपातील राहुटीत पोलीस केंद्र होते, मात्र ते गेल्या १० वर्षांपासून काढून टाकण्यात आले आहे, सध्या लेणी परिसरात कार्यरत असलेले पोलीस दिवसभर कर्तव्य बजावून मार्गस्थ होतात, त्यामुळे लेणासह परिसरातील सुरक्षा वारयावर असल्याने याचाच फायदा उचलत चोरट्यांनी एटीएम वर डल्ला मारला आहे.