जालना येथे दोन दिवसीय वारकरी-संत साहित्य संमेलनाचे आयोजन
जालना: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि जालना येथील जेईएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दोन दिवसीय संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या संमेलनाची संकल्पना ‘ज्ञानाचा सुवर्णक्षण: संत परंपरेचा अमृतमहोत्सव’ अशी आहे.
संत परंपरेच्या त्रयीचा ‘सुवर्णक्षण’:
सन २०२५ हे वर्ष मराठी संत परंपरेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या वर्षात ज्ञानसूर्य संत ज्ञानेश्वर माऊलींचे ७५० वे जयंती वर्ष, संत नामदेव महाराजांचे ६७५ वे संजीवन समाधी वर्ष आणि जगद्गुरु संत तुकोबारायांच्या वैकुंठागमनाचे ३७५ वे वर्ष साजरे करण्याचे भाग्य लाभले आहे. ज्ञानोबा-नामदेव-तुकोबा यांच्या या पावन स्मृतींनी पुनित झालेल्या वातावरणात, त्यांच्या विचारांचा अमृतप्रवाह समाजमनापर्यंत पोहचविण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजनासाठी बैठक संपन्न:
या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने जेईएस महाविद्यालयाला हे महत्त्वपूर्ण संमेलन आयोजित करण्याची संधी दिली आहे. या संमेलनाच्या आयोजनाची रूपरेखा निश्चित करण्यासाठी जालना जिल्ह्यातील वारकरी, साहित्यिक, शिक्षक आणि प्राध्यापक यांची नुकतीच एक बैठक महाविद्यालयात पार पडली. या बैठकीत संमेलनाचे अध्यक्ष, विविध चर्चासत्रे, कीर्तन, मुलाखत, ग्रंथदिंडी यांसारख्या कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या संमेलनात जिल्ह्यातील वारकरी, महिला तसेच शहरातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संमेलनाच्या आयोजना संदर्भात सविस्तर चर्चा झाली.
यावेळी उपप्राचार्य डॉ. महावीर सदावर्ते, जेष्ठ साहित्यिक प्रा. बसवराज कोरे, प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे, डॉ. उमेश मुंढे, ह.भ.प. भगवान महाराज गायकवाड, ह.भ.प. सोनुने गुरुजी कुंभारझरी, ह.भ.प. झगरे गुरुजी, डॉ. प्रमोद महाराज कुमावत, ह.भ.प. डॉ. ऋषिबाबा शिंदे, डॉ. एकनाथ शिंदे, ह.भ.प. सतीश महाराज बनकर, ह.भ.प. संतोष वाघ, ह.भ.प. वसंता महाराज चव्हाण, डॉ. वासुदेव उगले, प्रा. राहुल आंभोरे, डॉ. राजेंद्र सोनवणे, बाबासाहेब वाघ, डॉ. शिवानंद मुंढे, प्रा. उद्धव बिन्नीवाले, डॉ. सत्यशिला तौर, प्रा. बाबासाहेब खंडाळे, विलास खरवडे, नवनाथ गीते, गुट्टे मामा आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. यशवंत सोनुने यांनी केले, तर डॉ. बी. जी. श्रीरामे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संत साहित्याचा वसा आणि वारसा जपणाऱ्या या संमेलनामुळे जालना जिल्ह्याच्या साहित्यिक रसिकांना मान्यवर कीर्तनकार आणि अभ्यासकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.
