वाहनांवर नियंत्रण आणायला हवे
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी जोरदार वाहनांची खरेदी केल्याचे समोर आले आहे. गुढीाडव्याच्या दिवशी १० हजार १७० वाहनांची खरेदी केली. त्यात ६५१० दुचाकी, २४२४ चारचाकी, ५१७ गुड्स , २८३ रिक्षा, ६८ बस, २३४ टॅक्सी, १३४ अन्य वाहने पुणेकरांनी खरेदी केल्याची नोंद आरटीओत करण्यात आली. मागील वर्षापेक्षा या वर्षी वाहन खरेदीची संख्या तीन हजाराने अधिक आहे. मागच्या वर्षी याच काळात ७३३६ वाहनांची नोंद झाली होती याचाच अर्थ मागील वर्षी पेक्षा यावर्षी अधिक वाहनांची खरेदी पुणेकरांनी केली. आधीच पुणे शहरात वाहनांची संख्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. त्यात या दहा हजार वाहनांची भार पडली आहे. केवळ पुणे शहरातच एका दिवशी दहा हजारांपेक्षा अधिक वाहनांची खरेदी झाली याचाच अर्थ राज्यातील इतर शहरातही वाहनांच्या खरेदीने उच्चांक केला आहे. पुण्यापेक्षा मुंबई, ठाणे या शहरात अधिक वाहनांची खरेदी झाल्याची बाब समोर आली आहे. प्रत्येक शहरात साधारणपणे पाच हजार वाहनांची खरेदी झाल्याचे गृहीत धरले तरी हा आकडा खूप मोठा होतो. पुण्याप्रमाणेच मुंबई शहरातही वाहनांची संख्या अधिक आहे. मुंबईत चार चाकी आणि दुचाकी वाहनांची संख्या ३५ लाखांच्या पुढे गेली आहे. वाढत्या वाहनांमुळे शहरातील रस्ते अपुरे पडू लागली आहेत. शिवाय पार्किंगचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुंबईत गाड्या पार्क करण्यासाठी जी वाहनतळे आहेत त्यात साधारणपणे दहा हजारांच्या आसपास वाहने पार्क करता येतात. परिणामी रस्त्यांवर अवैध पार्किंगची संख्या वाढली आहे त्याचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे. या अवैध पार्किंगवर न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. वाढत्या वाहनांमुळे मुंबई, पुण्यातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे पण याची ना कोणाला फिकीर ना खंत. एकेकाळी पुणे शहर हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे ती ओळख आता पुसली गेली आहे. वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणाची पातळी कमालीची वाढली आहे. प्रदूषणामुळे दिल्लीची काय अवस्था झाली आहे ते आपण पाहतोच आहे, दिल्ली प्रमाणेच इतर शहरांची अवस्था व्हायला नको असेल तर वाहनांवर नियंत्रण आणायला हवे. नवीन वाहने विकत घेण्यापेक्षा बेस्ट, पीएमपीएल यासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर नागरिकांनी करायला हवा पण नागरिकांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विश्वास नाही. बेस्ट, पीएमपीएल यासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नागरिकांना सक्षम सेवा देण्यात अपयशी ठरत आहे. म्हणून जो तो नवीन वाहन घेत आहे. पुण्यामुंबई सारख्या शहरातील वाहनांची संख्या कमी करायची असेल तर बेस्ट, पीएमपीएल सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने आपला कारभार सुधारून नागरिकांना योग्य सेवा द्यायला हवी. बेस्ट, पीएमपीएल यासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केल्यास पुण्यामुंबईतील वाहनांच्या संख्येवर नियंत्रण येईल यात शंका नाही.
-श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे