Saturday, October 25, 2025
Homeऔरंगाबादउत्कृष्ट ग्रंथालय व उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार अर्ज सादर...

उत्कृष्ट ग्रंथालय व उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार अर्ज सादर करण्याचे आवाहन

उत्कृष्ट ग्रंथालय व उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार अर्ज सादर करण्याचे आवाहन

खुलताबाद/प्रतिनिधी/ डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन २०२४-२५ मध्ये वितरित करण्यात येणार आहे या करिता सार्वजनिक ग्रंथालय यांनी अर्ज सादर करणे बाबत आवाहन ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर  यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार” तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” देण्यात येतात.
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील “अ”, “ब”, “क”, “ड” वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रु.१,००,०००/-, रु.७५,०००/-, रु.५०,०००/-, रु.२५,०००/- इ. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.
राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रु.५०,०००/- तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रु. २५,०००/- इ. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.
सन २०२४-२५ या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असे आवाहन  अशोक  गाडेकर, प्र. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments