उरूण इस्लामपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्यास परवानगी मिळावी,असे पत्र राजारामबापू सहकारी बँकेने नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले
इस्लामपूर/प्रतिनिधी/ साहित्यरत्न,सत्यशोधक,लोक- शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उरूण इस्लामपूर नगरपरिषदे समोरील मुख्य चौकात उभारण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी राजारामबापू सहकारी बँकेने पत्राद्वारे उरूण इस्लामपूर नगरपरिषदेकडे केली आहे. राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव यांनी हे मागणी पत्र उरूण इस्लामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.या प्रसंगी बँकेचे माजी अध्यक्ष,विद्यमान संचालक प्रा.शामराव पाटील,बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बाबर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आपण आपला प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने पाठवू,अशी ग्वाही मुख्याधिकारी श्री.पाटील यांनी दिली आहे.
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी कचेरी चौकात आंदोलन कर्त्या कार्यकर्त्यांना भेटून राजारामबापू सहकारी बँकेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार राजारामबापू बँकेच्या वतीने नगरपालिकेकडे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्यास परवानगी देण्याबद्दल हे पत्र दिले आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा उरूण इस्लामपूर शहरात पूर्णाकृती पुतळा व्हावा,ही
वाळवा तालुक्यातील अण्णाभाऊं यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेची इच्छा आहे. राजारामबापू सहकारी बँकेने गेल्या ४४ वर्षात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कला,क्रीडा,साहित्य संगीत आणि समाजोपयोगी कामात सातत्याने मदतीचा हात दिला आहे.आमच्या बँकेचे संस्थापक लोकनेते राजाराम बापू पाटील आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. अण्णा भाऊ हे वाळवा तालुक्याचे सुपुत्र आणि भूषण आहेत. त्यांचा उरूण इस्लामपूर या तालुक्याच्या मुख्य शहरात पुतळा उभा करण्यात आमची बँक सर्वोत्तपरी जबाबदारी घेत आहे.उरूण इस्लामपूर नगर पालिकेने उरूण इस्लामपूर शहरातील विविध चौकात आयलँड उभा करावेत,असे स्वयंसेवी संस्था आणि सहकारी संस्थांना आवाहन केले होते. त्या प्रमाणे आमच्या बँकेने १० लाख रुपये खर्चून नगरपालिकेसमोरील मुख्य चौकात आयलँड उभा केला आहे. त्या जागेवर राजारामबापू सहकारी बँकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याची तयारी आहे. तरी पण नगरपालिकेने आम्ही उभारलेल्या आयलँडच्या जागेवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यास परवानगी द्यावी,असे पत्रात म्हंटले आहे.