Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा

कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

छत्रपती संभाजीनगर : बर्कले येथील जागतिक किर्तीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाशी महाराष्ट्र शासनाने ऊर्जा संशोधन आणि धोरण विकास क्षेत्रातील सहकार्यासंबंधी सामंजस्य करार केला आहे. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमाला कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्रतिनिधी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण बी, महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार उपस्थित होते. श्रीमती शुक्ला आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाचे वरिष्ठ सल्लागार मोहित भार्गव यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या करारामुळे महाराष्ट्रातील उर्जा क्षेत्रात संशोधन, तांत्रिक नवकल्पना आणि धोरणात्मक सहकार्याला गती मिळणार आहे. ऊर्जेचा स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणारा पुरवठा, ऊर्जा साठवणूक उपाय, वीज बाजार रचना, ग्रीड प्रसारण प्रणालीतील सुधारणा, हवामानाशी जुळवून घेणारी धोरणे आणि प्रशिक्षण कार्यक्रम या क्षेत्रांमध्ये संयुक्त काम होणार आहे.

“कॅलिफोर्निया विद्यापीठासारख्या संस्थेच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात उर्जा क्षेत्रात जागतिक दर्जाचे संशोधन आणि नवसंशोधनाला चालना मिळेल. या सामंजस्य करारामार्फत उर्जा साठवणूक, वीज बाजार, प्रसारण व्यवस्था आणि हवामान बदलाशी जुळवून घेणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन, ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता वृद्धी यांना चालना मिळणार आहे. स्वच्छ, विश्वासार्ह आणि शाश्वत उर्जेच्या दिशेने सहकार्याचा नवा अध्याय सुरू होत आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र सरकार आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले यांच्यातील हे सहकार्य परस्पर विश्वास, समानता आणि सामूहिक हिताच्या तत्त्वांवर आधारित असून, राज्याच्या उर्जा क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार स्थानिक उपाययोजना विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

हा करार लवचिक स्वरूपाचा असून त्यामुळे भविष्यातील प्रकल्पांनुसार सहकार्याचे दरवाजे खुले राहतील. या करारामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे आणि प्रशासन यांना नवसंशोधन, क्षमता वृद्धी व प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. त्यामुळे पर्यावरणस्नेही आणि शाश्वत उर्जेच्या दिशेने राज्याचा प्रवास अधिक गतिमान होईल, असा विश्वास ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी व्यक्त केला.

या सामंजस्य करारामध्ये खालील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ज्ञानसंपादन, संशोधन आणि प्रशिक्षणाची संधी मिळणार

  • स्वच्छ,विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या विजेचा विकास
  • ऊर्जा साठवणतंत्रज्ञानावर संयुक्त संशोधन
  • वीज मार्केटची रचना आणि धोरण निर्मिती
  • ग्रीड प्रसारण क्षेत्रातील नवोन्मेष
  • हवामान अनुकूलता (climate resilience)उपाययोजना
  • कौशल्यविकास आणि प्रशिक्षण उपक्रम
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments