उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा विजय होणार, ‘युपीए‘च्या ठिकऱ्या उडणार
बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी भाजपाला शहाणपण शिकवू नये
भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा संजय राऊत यांच्यावर प्रहार
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय होणार असून युपीएच्या ठिकऱ्या उडणार आहेत. युपीएतील खासदारसुद्धा आता राहुल गांधींच्या अपरिपक्व राजकारणाला कंटाळले असून क्रॉस व्होटिंगचा युपीएला धोका आहे. सर्वाधिक सावध रहाण्याची गरज युपीए आणि राहुल गांधी यांना आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना सावधगीरीचा सल्ला द्यावा अशी खोचक टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केली. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी भाजपाला शहाणपण शिकवू नये, असेही श्री. बन यांनी नमूद केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भारतीय जनता पार्टीने यावेळी मुहूर्त न काढता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पितृपक्षात घेतल्यामुळे भाजपा हा सेक्युलर झाला या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना श्री. बन यांनी श्री. राऊत यांना लक्ष्य केले. भाजपासाठी 365 दिवस पवित्र असल्याने आम्हाला निवडणुकीचा मुहूर्त काढावा लागत नाही. पितृपक्ष असल्याने निवडणूक घेऊ नये, हा संजय राऊत यांचा केवळ बहाणा आहे. खरं म्हणजे ते घाबरले असून निवडणुकीपासून पळ काढत आहेत अशी टीका श्री. बन यांनी केली.
मुंबई महापालिका निवडणुकीत मविआचा नव्हे तर महायुतीचा महापौर होणार आहे. संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणं थांबवावे. आज खरी शिवसेना भाजपासोबत आहे. आगामी महापालिका निवडणुकाही आम्ही मराठी माणसाच्या आणि सर्वसामान्यांच्या ताकदीवर जिंकणार आहोत असा विश्वास श्री. बन यांनी व्यक्त केला.
गणेशोत्सव प्रिय नाही,
गणेशोत्सव हा हिंदूंचा आहे. लालबागचा राजा श्री. राऊत यांना पावणार नाही कारण राऊतांना गणेशोत्सवापेक्षा अफजलखानाची कबर जास्त प्रिय वाटते. संपूर्ण महाराष्ट्र आनंदाने गणेशोत्सव साजरा करतो पण तुम्हाला नेमके तेच खुपते. गणेशोत्सवाला जात नाही असं कितीही श्री. राऊत यांनी सांगितलं तरी महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मोठ्या उत्साहात साजरा करतो.
सामना वर्तमानपत्रात देवाभाऊंच्या जाहिराती आल्या नाहीत म्हणून श्री. राऊत यांचे पोट दुखतंय. सामना कदाचित काळ्या कर्मांवर चालत असेल, पण भाजपाचा कारभार स्वच्छ, पारदर्शी आहे. देवाभाऊंवर असलेल्या मराठी माणसाच्या आणि मतदारांच्या प्रेमातूनच आमच्या जाहिराती येतात. श्री. राऊत यांनी भाजपाच्या जाहिरातींवर 50 कोटी खर्च झाल्याचा आरोप केला. त्यावर नवनाथ बन यांनी पलटवार करत संजय राऊत यांच्या बुद्धीचं विसर्जन झालं आहे अशी जोरदार टीका त्यांनी केली. 50 कोटी रुपयांचा खर्च लोकसभा निवडणुकीत देखील होत नाही हे स्पष्ट करत उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला येणाऱ्या जाहिराती कोणत्या पैशातून येतात हे त्यांनी एकदा जाहीर करावं असे आव्हान श्री. बन यांनी दिले.
