जिल्हा परिषदेच्या मुख्य नुतन इमारतीच्या प्रांगणात
स्व.यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा उभारा
आ.सतीश चव्हाण यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर– छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य नुतन इमारतीच्या प्रांगणात स्व.यशवंराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी आज शिष्टमंडळासह पालकमंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेतली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत ही निजामकालीन वास्तूमध्ये होती. ही वास्तू जीर्ण झाल्यामुळे शासनाने नवीन प्रशासकीय इमारत उभारणीचे काम हाती घेतले होते. सदरील नवीन प्रशासकीय इमारत उभारणीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय रचना अस्तित्वात आली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या या मुख्य नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात स्व.यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतरावजी चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या उभारणीतील योगदान कुणीही विसरू शकत नाही. शेती, सिंचन, शिक्षण, आरोग्य, उद्योग, सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी समर्पकतेने काम केले. आज आपला महाराष्ट्र ज्या प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर आहे, त्या वाटेचा पाया स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीने रचलेला आहे. जिल्हा परिषद हे ‘मिनी’ मंत्रालय म्हणून ओळखले जाते. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची टोलेजंग नुतन इमारत तयार झाली आहे. या इमारतीच्या मुख्य प्रांगणात स्व.यशवंरावजी चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला तर त्यांच्या कार्याचा तो गौरव तर ठरेलच शिवाय नवीन पिढीला त्यांचा पुतळा कायम प्रेरणा देणारा असेल असे आमदार सतीश चव्हाण यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात त्वरीत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. याप्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष व्दारकाभाऊ पाथ्रीकर, रंगनाथराव जाधव, प्रा.विजय पाथ्रीकर, उदयसेन देशमुख, त्रिंबकराव पाथ्रीकर, दिलीप बनकर, प्रा.देगावकर, दत्ता भांगे आदींची उपस्थिती होती.
