Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादउबाठा गट सांभाळता येत नसलेल्या राऊतांनी पंतप्रधान मोदींना सल्ले देऊ नयेत

उबाठा गट सांभाळता येत नसलेल्या राऊतांनी पंतप्रधान मोदींना सल्ले देऊ नयेत

उबाठा गट सांभाळता येत नसलेल्या राऊतांनी पंतप्रधान मोदींना सल्ले देऊ नयेत

भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचे शरसंधान

आखाती देशांतील युद्धजन्य स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशी भूमिका घ्यायला हवी याचे धडे राऊतांनी देणे हास्यास्पद आहे. ज्यांना कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक सांभाळता आले नाहीत, रेणापूरमध्ये उबाठाच्या सर्व उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यावी लागली, ज्यांना स्वतः चा पक्ष सांभाळता येत नाही त्यांनी इराण इस्राईल युद्धासंदर्भात फुकाच्या गप्पा मारून पंतप्रधान मोदी यांना सल्ले देऊ नयेत, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशसुरक्षा आणि हित साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम असून वेळोवेळी राष्ट्रहित डोळ्यासमेर ठेवून योग्य भूमिका मांडत आहेत असेही त्यांनी नमूद केले.

            संजय राऊत हे कमकुवत झालेल्या उबाठा गटाचे प्रवक्ते म्हणून पक्ष वाचवण्यासाठी काम न करता आता विश्वप्रवक्ते असल्याप्रमाणे  आंतरराष्ट्रीय अभ्यासक असल्याचा आव आणत आहेत. भारताचे मीठ खायचे आणि इतर देशांचे गुणगान गायचा धंदा राऊतांनी सुरू केला असून देशाची बदनामी करत असल्याचा प्रहार श्री. बन यांनी केला. इतकाच कळवळा असेल तर गाझा पट्टीमध्ये जाऊन युद्ध लढावे असा खोचक सल्ला त्यांनी दिला. उबाठा गट ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला आहे त्या काँग्रेसने देशाला गुलामगीरीच्या खाईत लोटले होते हा इतिहास जरा राऊतांनी वाचावा असा टोमणा त्यांनी  लगावला. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 140 कोटी जनतेला स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. भारत अमेरिका करारात देखील राष्ट्रहित, जनहित साधण्याचा प्रयत्न झाला असून पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांमुळेच भारताची अर्थव्यवस्था आज चौथ्या क्रमांकावर पोहोचली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

उबाठा गट, राऊतांना महाराष्ट्रातील मतदारांनी तीन वेळा नाकारून उबाठा गटाची लायकी काय हे दाखवून दिले आहे असे म्हणत श्री.बन यांनी राऊतांवर पलटवार केला. देशावर थुंकण्याची भाषा राऊतांना शोभत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थुंकण्याची भाषा करणा-यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही.  राऊतांनी मराठी शब्दांच्या अचूक अर्थाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे असे ते म्हणाले . साध्या सोप्या कठपुतळी शब्दाचा अर्थही राऊतांना माहित नसल्याने तो अर्थ समजावून सांगताना श्री. बन यांनी राऊतांवर शरसंधान साधले. मोदी सरकारवर ‘अमेरिकेची कठपुतळी’ अशी टीका करणारे राऊत स्वत: सोनिया गांधींच्या हातातील बाहुले आहेत, शरद पवारांच्या इशा-यावर नाचणारी कठपुतळी आहेत असा हल्लाबोल त्यांनी केला. दुबईत अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीयांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात यश आले असल्याचेही  श्री. बन म्हणाले

 –मुकुंद कुलकर्णी

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments