ट्रम्पशाही विरोधात अमेरिकन जनता रस्त्यावर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हुकूमशाही आणि युद्धखोर वृत्तीने संपूर्ण जग वैतागले आहे. आपल्या हेकेखोरापणामुळे संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईत लोटणाऱ्या ट्रम्प यांच्यावर जगभरातील जनता वैतागली आहे कारण त्यांनी ज्याप्रकारे इराणवर हल्ला करून संपूर्ण जगाला वेठीस धरले ते कोणालाही आवडले नाही. ट्रम्प यांच्या हुकूमशाही वृत्तीला आता त्यांच्या देशातील जनताही वैतागली असल्याचे दिसून येत आहे. ज्या अमेरिकन जनतेने दीड वर्षापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना भरभरून मते देऊन राष्ट्राध्यक्ष बनवले तीच अमेरिकन जनता आता त्यांच्या विरुद्ध रस्त्यांवर उतरून आंदोलने करीत आहे. विशेष म्हणजे ही आंदोलने फक्त एका शहरात किंवा राज्यात होत आहेत असे नाही तर अमेरिकेतील सर्व शहरात होत आहेत आणि त्यात लाखो अमेरिकन नागरिक सहभागी होत आहेत. कोणताही विचार न करता इराणवर हल्ला करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या आततायी निर्णयाचा निषेध करण्यासाठी अमेरिकेत लाखो लोक रस्त्यांवर उतरले अमेरिकेचा राष्ट्रध्वज उलटा करून नागरिकांनी ट्रम्प यांचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. या आंदोलनाला आंदोलनकर्त्यांनी नो किंग्ज असे नाव दिले. आम्हाला राजा नको तर लोकशाही मानणारा राष्ट्राध्यक्ष हवा जो लोकशाहिवृत्तीने देशाचा कारभार करेल अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिले. ट्रम्प यांची छबी विदुषकी रूपात दाखवून डोनाल्ड ट्रम्प चालते व्हा ! अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. या आंदोलनात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात महिलांची संख्याही लक्षणीय होती. ट्रम्प यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता इराणवर हल्ला केला. खामेनी यांची हत्या करून दोन चार दिवसात इराणवर सहज विजय मिळवू अशा थाटात इराणवर हल्ला करणाऱ्या ट्रम्प यांना महिना उलटून गेला तरी इराणवर विजय मिळवता आला नाही. इराणला शरण आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ट्रम्प यांच्यावरच आता युद्धातून माघार घेण्याची वेळ आली आहे. ट्रम्प यांच्यामुळे संपूर्ण जगात अमेरिकेची नाचक्की होत आहे ही बाब अमेरिकेच्या जनतेला आवडली नाही म्हणूनच ते ट्रम्प यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरत आहे अर्थात ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकन लोक रस्त्यावर उतरण्याची ही पहिलीच वेळ नाही. वर्षभरापूर्वी स्थलांतरितांना हद्दपार करणे आणि गरिबांसाठी मेडिकेम सुविधा कमी करणे याविरोधात १६०० हून अधिक ठिकाणी अमेरिकन नागरिकांनी निदर्शने केली होती. त्या आंदोलनाला आंदोलकांनी गुड ट्रबल लाईव्हज ऑन असे नाव दिले होते. शिकागो हे या आंदोलनांचे मुख्य केंद्र होते. या आंदोलनातही लाखो नागरिक रस्त्यावर जमले होते. त्यावेळी सर्वांनी हातात मेणबत्ती घेऊन मोर्चा काढला होता. ते आंदोलन शांततेत पार पडले तरी त्या आंदोलनातही आंदोलकांनी ट्रम्प यांच्या विरोधात रोष व्यक्त केला होता. त्याआधीही अमेरिकन लोकांनी ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून असेच आंदोलन केले होते त्या आंदोलनाला हँडस ऑफ असे नाव दिले होते. त्या आंदोलनातही लोकांनी ट्रम्प यांच्या विरोधात रोष व्यक्त करणाऱ्या घोषणा दिल्या होत्या. आताचे आंदोलनही त्याच धर्तीवर शांततेत पार पडत असले तरी लोक ट्रम्प यांच्या विरोधात तितकाच रोष व्यक्त करत आहेत. या आंदोलनाविषयी सांगताना आंदोलनकर्ते म्हणतात आपण आपल्या देशाच्या इतिहासातील भयानक काळातून जात आहोत. सरकारमध्ये वाढत्या हुकूमशाही वृत्तीचा आणि कायद्याच्या उल्लंघनाचा सामना करत आहोत, जो आपल्या लोकशाही स्वातंत्र्याला आणि अधिकारांना आव्हान देत आहे. हे आंदोलन लोकशाहीसाठी असल्याचे आंदोलनकर्ते सांगत आहेत. या आंदोलनात अमेरिकेतील दीडशे पेक्षा जास्त गटांनी सहभाग घेतला असून त्यात सामाजिक हक्क संघटना, कामगार संघटना, एलजीबिटीक्यू प्लस समर्थक गट, सामाजिक आणि लोकशाहीवादी गटांचा समावेश आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील हे आंदोलनही शांततेत पार पडत असल्याने कोणालाही अटक करण्यात आले नाही मात्र या आंदोलनामुळे अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांची जगभर अप्रतिष्ठा झाली आहे. ज्या डोनाल्ड ट्रम्प यांना जनतेने सत्तेवर बसवले त्यांच्याच विरोधात जनतेला रस्त्यांवर का उतरावे लागत आहे असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचे उत्तर आहे ट्रम्प यांचा एककल्ली आणि मनमानी कारभार. राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे पण हे निर्णय घेताना त्यांनी अनेकांना दुखावले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला इतर देशातून आयात होणाऱ्या मालांवर भरमसाठ कर लावला त्यामुळे जगात व्यापार युद्धाला तोंड फुटले याचा परिणाम जितका जगावर झाला तितकाच तो अमेरिकेवर देखील झाला. या व्यापार युद्धामुळे अमेरिकन बाजारपेठेत मंदी येण्याची भीती निर्माण झाली. ट्रम्प यांनी हजारो केंद्रीय कर्मचाऱ्यांची कपात, सामाजिक सुरक्षा व्यवस्थापन कार्यालये बंद करणे, मदत एजेंसी बंद करणे, स्थलांतरितांना हद्दपार करणे, तृतीय पंथीयांच्या कामाच्या संधी कमी करणे, आरोग्य कार्यक्रमांच्या निधीमध्ये कमी करणे हे आणि यासारखे अनेक निर्णय अमेरिकेतील जनतेला पटले नाहीत. आता तर इराणवर हल्ला करून ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला महागाईच्या खाईत लोटले. ट्रम्प यांच्या या सर्व निर्णयांना विरोध करण्यासाठीच अमेरिकन जनता रस्त्यावर उतरत आहे. जनतेचा वाढता रोष कमी करण्यासाठी व्हाईट हाऊस पुढे सरसावली आहे मात्र त्याचा आंदोलकांवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. आंदोलनाची धग वाढतच चालली आहे. एककल्ली, मनमानी कारभार केला तर जनता ती खपवून घेत नाही हेच या आंदोलनातून अमेरिकन जनतेने दाखवून दिले आहे. हे आंदोलन जर असेच चालू राहिले तर डोनाल्ड ट्रम्प यांना जनतेपुढे झुकावेच लागेल आणि आपल्या एककल्ली स्वभावाला मुरड घालून जनतेच्या हिताचे असे सर्वसमावेशक निर्णय घ्यावे लागेल.
-श्याम ठाणेदार