Monday, March 30, 2026
Homeअग्रलेखट्रम्प यांच्या विरुद्ध ' हॅण्डस ऑफ' 

ट्रम्प यांच्या विरुद्ध ‘ हॅण्डस ऑफ’ 

ट्रम्प यांच्या विरुद्ध ‘ हॅण्डस ऑफ’ 
        अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येऊन जेमतेम तीन महिने झाले. या तीन महिन्यातच अमेरिकन जनता त्यांना वैतागली असल्याचे दिसून येत आहे. ज्या अमेरिकन जनतेने तीन महिन्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना भरभरून मते देऊन राष्ट्राध्यक्ष बनवले तीच अमेरिकन जनता आता त्यांच्या विरुद्ध रस्त्यांवर उतरून आंदोलने करीत आहे. विशेष म्हणजे ही आंदोलने फक्त एका शहरात किंवा राज्यात होत आहेत असे नाही तर अमेरिकेतील सर्वच्या सर्व म्हणजे पन्नास राज्यातील बाराशे शहरात होत आहेत आणि त्यात लाखो अमेरिकन नागरिक सहभागी होत आहेत. आंदोलकांनी या आंदोलनाला ‘हॅण्डस ऑफ’ आंदोलन असे नाव दिले असून हे आंदोलन लोकशाहीसाठी असल्याचे सांगितले जात असून या आंदोलनात अमेरिकेतील दीडशे पेक्षा जास्त गटांनी सहभाग घेतला असून त्यात सामाजिक हक्क संघटना, कामगार संघटना, एलजीबिटीक्यू प्लस समर्थक गट, सामाजिक आणि लोकशाहीवादी गटांचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातले हे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू असल्याने  कोणालाही अटक करण्यात आली नाही मात्र या आंदोलनामुळे अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांची जगभर अप्रतिष्ठा झाली आहे हे मात्र नक्की. आंदोलकांनी केवळ डोनाल्ड ट्रम्प यांच्याच विरोधात नव्हे तर त्यांचे सहाय्यक ॲलन मस्क यांच्या विरोधातही घोषणा दिल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी ज्या डोनाल्ड ट्रम्प यांना जनतेने सत्तेवर बसवले त्यांच्याच विरोधात जनतेला रस्त्यांवर का उतरावे लागत आहे असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचे उत्तर आहे ट्रम्प यांचा एककल्ली आणि मनमानी कारभार. राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे पण हे निर्णय घेताना त्यांनी अनेकांना दुखावले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशातून आयात होणाऱ्या मालांवर भरमसाठ कर लावला आहे. हे करताना त्यांनी अमेरिकेचेच भले होणार असे जनतेला ठासून सांगितले आहे.  डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला मेक्सिको, चीन, भारत, कॅनडा या देशांनीही जशास तसे उत्तर देऊन अमेरिकेतून आयात होणाऱ्या मालांवर तितकाच अतिरिक्त कर लावला आहे त्यामुळे जगात व्यापार युद्धाला तोंड फुटले आहे याचा परिणाम जितका जगावर होणार आहे तितकाच तो अमेरिकेवर देखील होणार आहे. या व्यापार युद्धामुळे अमेरिकन बाजारपेठेत  मंदी येण्याची भीती तेथील तज्ज्ञ व्यक्त करत  आहेत. जर अमेरिकेत मंदी आली तर अमेरिकेत महागाई वाढेल त्याचा फटका तेथील सर्वसामान्य नागरिकांनच बसेल त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय तेथील सर्वसामान्य लोकांना पटलेला नाही. केवळ हा एकमेव निर्णय नाही तर गेल्या काही दिवसात ट्रम्प यांनी घेतलेले अनेक निर्णय जनतेच्या पचनी पडले नाहीत त्यात हजारो केंद्रीय कर्मचाऱ्यांची कपात, सामाजिक सुरक्षा व्यवस्थापन कार्यालये बंद करणे, मदत एजेंसी बंद करणे, स्थलांतरितांना हद्दपार करणे, तृतीय पंथीयांच्या कामाच्या संधी कमी करणे, आरोग्य कार्यक्रमांच्या निधीमध्ये कमी करणे हे आणि यासारखे अनेक निर्णय अमेरिकेतील जनतेला पटले नाहीत या निर्णयांना विरोध करण्यासाठीच अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली आहे. जनतेचा वाढता रोष कमी करण्यासाठी व्हाईट हाऊस पुढे सरसावली आहे मात्र त्याचा आंदोलकांवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. आंदोलनाची धग वाढतच चालली आहे. एककल्ली,  मनमानी कारभार केला तर जनता ती खपवून घेत नाही हेच या आंदोलनातून अमेरिकन जनतेने दाखवून दिले आहे. हे आंदोलन जर असेच चालू राहिले तर   डोनाल्ड ट्रम्प यांना जनतेपुढे झुकावेच लागेल आणि आपल्या एककल्ली स्वभावाला मुरड घालून जनतेच्या हिताचे असे सर्वसमावेशक निर्णय घ्यावे लागेल.
– श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments