टीम इंडियात स्थान मिळवण्यात सरफराज खानचा धर्म आडवा आला? निवड समितीच्या माजी प्रमुखाने स्पष्टच सांगितलं…
दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध होणाऱ्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या भारतीय ‘अ’ संघात मधल्या फळीतला फलंदाज सरफराज खानला स्थान देण्यात आलेले नाही. त्याला संघात संधी न मिळाल्याने राजकीय स्तरावर मोठी चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणावर बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ता एम.एस.के. प्रसाद यांनी मोठं विधान केलं आहे.
माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी धर्माचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल टीकाकारांना फटकारले. एम.एस.के. प्रसाद म्हणाले की, “निवड समिती कधीही कोणत्याही खेळाडूचा धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमी पाहून निर्णय घेत नाही. जे लोक असं मानतात, त्यांना भारतीय क्रिकेटची अजिबात जाण नाही. सरफराज खानचा मुद्दा सोडा, सर्वसाधारणपणे कोणत्याही खेळाडूची निवड होत असताना प्रांत, समाज किंवा धर्म या गोष्टींचा विचार केला जात नाही. पण एखादा खेळाडू संघाबाहेर राहिला की अशा चर्चा का रंगतात? सगळ्यांना माहीत आहे की सरफराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. निवडकर्त्यांकडे त्याच्या निवडीबाबत काही कारणं असतील, ती ते स्पष्ट करू शकतात.”
एम.एस.के. प्रसाद हे 2016 ते 2020 या कालावधीत बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता होते. सरफराज खानला भारतीय ‘अ’ संघात स्थान न मिळाल्यानंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी एक्स (माजी ट्विटर) वरून प्रतिक्रिया देत या निर्णयावर सवाल उपस्थित केला आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही जबाबदार धरले.
शमा मोहम्मद यांची प्रतिक्रिया
शमा मोहम्मद यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं, “सरफराज खानला त्याच्या आडनावामुळे संघात स्थान देण्यात आलं नाही का? फक्त विचारत आहे… आपण सगळे जाणतो की या बाबतीत गौतम गंभीर यांची विचारसरणी काय आहे.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), आयुष म्हात्रे, एन जगदीसन (यष्टीरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुष कोटियन,मानव सुथार, अंशुल कंबोज, यश ठाकूर, आयुष बडोनी, सरांश जैन.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), केएल राहुल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, खलील अहमद, गुरनूर ब्रार, अभिमन्यू इसवरन, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
