Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गावे होणार टँकरमुक्त; ‘जलसमृद्ध गाव अभियाना’चा निर्धार!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गावे होणार टँकरमुक्त; ‘जलसमृद्ध गाव अभियाना’चा निर्धार!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गावे होणार टँकरमुक्त;

‘जलसमृद्ध गाव अभियाना’चा निर्धार!

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने . ‘जलसमृद्ध गाव अभियान’ अंतर्गत जिल्ह्यातील 968 गावे आणि 12 वाड्यांना टँकरमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. सध्या या भागातील नागरिकांना 263 टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

पावसाळ्यामध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने आणि भूगर्भातील पाण्याची पातळी घटल्याने अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. गावांना पाणीटंचाईतून कायमस्वरूपी मुक्ती मिळवण्यासाठी ‘जलसमृद्ध गाव अभियान’ राबविण्यात येणार आहे.

या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात, ज्या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो आणि ज्या गावांमध्ये 191 अधिग्रहित विहिरी आहेत, अशा गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक गावातील किती विहिरी आणि बोअरवेल पुनर्भरण करण्याची गरज आहे, याचा आढावा घेतला जाईल.

या अभियानांतर्गत गावातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी इमारतींवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम’ बसवण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. ‘जलसमृद्ध गाव अभियाना’च्या माध्यमातून जिल्ह्यातील गावे लवकरच पाणीटंचाईमुक्त होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

  कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

या अभियानांतर्गत काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना विहिरी आणि बोअरवेलचे पुनर्भरण तसेच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या कामांची माहिती दिली जाईल.

तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समित्यांच्या माध्यमातून गावांमध्ये जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविली जाणार आहेत. यासाठी आवश्यक असणारे तांत्रिक ज्ञान कर्मचाऱ्यांकडे असणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 19 मे 2025 ते 24 जून 2025 या कालावधीत टप्प्याटप्प्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.

प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांना पावसाळ्यामध्ये पडणारे संपूर्ण पाणी जमिनीत मुरवण्यासाठी योग्य उपाययोजना कशा कराव्यात, याबाबत मार्गदर्शन केले जाईल. तसेच, ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या माध्यमातून गावाला शाश्वत पाणीपुरवठा कसा करता येईल, यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.

टँकर लागलेल्या गावातील पाणीपुरवठा योजना, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक व पोलीस पाटील यांनी संयुक्तपणे पाहणी करून विहीर व बोअर पुनर्भरण तसेच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ संदर्भातील नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पाहणीत पाण्याची उपलब्धता आणि सर्वेक्षण केल्यानंतर कामासाठी अंदाजे किती खर्च येईल, याचे अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे.

प्रत्येक गावात वरील कामे प्रभावीपणे करावी, यासाठी प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी गावनिहाय कार्यशाळांचे आयोजनही केले जाणार आहे. त्यानंतर, तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती या कामांवर देखरेख ठेवणार असून, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जाईल.

या अभियानात तालुकास्तरावरील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपअभियंता पाणीपुरवठा आणि कनिष्ठ अभियंता यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ‘जलसमृद्ध गाव अभियान’ निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

जलसमृद्ध गाव अभियान’: गावनिहाय बैठका आणि प्रत्यक्ष कृती

येत्या काही दिवसांत तालुका आणि गावनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 15.05.2025 ते 20.05.2025 या कालावधीत तालुकास्तरीय बैठका घेऊन प्रत्येक तालुक्याच्या कामांचे नियोजन आणि संबंधित अंदाजपत्रक तयार केले जाईल.

त्यानंतर, दिनांक 21.05.2025 ते 23.05.2025 या काळात गावनिहाय बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये प्राथमिक तयारी आणि जनजागृतीवर भर दिला जाईल. गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या जागांची पाहणी केली जाईल. तसेच, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि जलसुरक्षा समितीचे सदस्य म्हणून काम पाहतील. गावातील सरपंच यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे या पाहणीचे अहवाल तयार करण्यात येतील.

दिनांक 25.05.2025 रोजी प्रत्येक तालुकास्तरावर आणि ग्रामपंचायत स्तरावर जनजागरण कार्यशाळा, बैठका इत्यादींचे आयोजन केले जाईल. याद्वारे नागरिकांमध्ये जलसंधारणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण केली जाईल.

प्रत्यक्ष कामांना सुरुवात दिनांक 27.05.2025 ते 30.05.2025या काळात होणार आहे. या दरम्यान, कोणत्या गावात विहीर आणि बोअरचे पुनर्भरण करणे शक्य आहे, याची पाहणी केली जाईल. त्याचबरोबर किती इमारतींवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम’ बसवता येईल, याचे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून नियोजन व आराखडा तयार करण्यात येईल. लोकसहभागातून ही कामे कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले जाईल. यात संबंधित नियोजन तालुकास्तरीय समिती तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना मार्गदर्शन करेल.

अखेरीस, दिनांक 01.06.2025 ते 15.06.2025 या कालावधीत प्रत्यक्ष गावात विहीर आणि बोअर पुनर्भरण तसेच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बरोबर पुनर्भरण करण्याचे काम हाती घेतले जाईल.

जिल्हाधिकारी कार्यालयाने या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कंबर कसली असून, निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या वेळापत्रकामुळे आता ‘जलसमृद्ध गाव अभियान’ अधिक वेगाने पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘जलसमृद्ध गाव अभियान’: प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाचे महत्वाचे निर्देश!

ग्रामसेवक आणि तलाठी यांनी संयुक्त पाहणीत सक्रिय सहभाग घ्यावा आणि योग्य माहिती सादर करावी. अंदाजपत्रक वस्तुनिष्ठ आणि अचूक असावे. गावातील नागरिकांचा सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. त्यांच्या मदतीने जलसंधारणाची कामे यशस्वी करायची आहेत. तसेच

तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे स्थापत्य अभियंता यांनी वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करावे.

यापूर्वीच्या जलयुक्त शिवार अभियानातील चांगल्या कामांचा अनुभव आणि त्यातील त्रुटी विचारात घ्याव्यात. करण्यात येणाऱ्या कामांची गुणवत्ता चांगली राहील, याची दक्षता घ्यावी. निकृष्ट कामे आढळल्यास कारवाई केली जाईल.  कामांची माहिती लोकांना सहज उपलब्ध झाली पाहिजे. ‘जलसमृद्ध गाव अभियान’ यशस्वी करण्याची जबाबदारी प्रशासनाने उचलली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments