सुदैवाने जीवितहानी टळली
कन्नड/प्रतिनीधी/ कन्नड नगरपरिषदेच्या मालकीची असलेली तहसील कार्यालयासमोरील व्यापारी संकुलाची इमारत आज ३ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी नाही.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, कन्नड नगरपालिका कार्यालयासमोर पालिका प्रशासनाने व्यापारी संकुलन सुमारे ५० वर्षापूर्वी उभारले आहे. याच इमारतीवर अंदाजे २० वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने एक मजला बांधून सदरील इमारतीतील
गाळे शहरातील व्यापाऱ्यांना भाडे तत्वावर वापरण्यास दिले आहेत.
मात्र या नवीन बांधलेल्या इमारतीच्या जिन्यावरील भिंतीला काही दिवसांपूर्वी तडे गेले होते. ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता वाढल्याने, पालिका प्रशासनाने १५ दिवसांपूर्वीच या इमारतीमधील सर्व व्यापाऱ्यांना गाळे खाली करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या होत्या. मात्र आपल्याच तंद्रीत असलेल्या या व्यापाऱ्यांपैकी कुणीही गाळे खाली केले नाहीत. आज झालेल्या या दुर्घटनेत नगरपालिकेच्या दर्शनी भागातील वरच्या मजल्यावरील ३ दुकाने खालील चार दुकानांवर कोसळले या दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
ही घटना घडताच तहसिलदार विद्याचरण कडवकर, नायब तहसिलदार दिलीप सोनवणे, प्रशांत काळे, पुरवठा निरिक्षक निलेश राठोड तलाठी दिपक एरंडे, मंडळ अधिकारी रमेश चव्हाण,कन्नड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप,सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक चांद मेंडके, सहायक फौजदार नासेर पठाण व त्यांचे सहकारी आणि पालिकेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुकानातील नागरिक व व्यापाऱ्यांना दुकानाबाहेर काढून मदतकार्य सुरू केले. ही इमारत कोसळली तेव्हा इमारतीच्या वरच्या मजल्यावर सुमारे १०० ते १५० नागरिक आपल्या वेगवेगळ्या कामानिमित्त थांबलेले होते. त्यांना पोलिस व तहसील प्रशासनाने दुसऱ्या बाजूने सुखरूप खाली उतरविले. छायाचित्र सुनिल निकम