इंदेवाडी पाण्याची टाकी ते गोकुळधाम रस्ता बनला मृत्युचा सापळा; संतप्त नागरीकांचे रास्तारोको आंदोलन
जालना/प्रतिनीधी/ जालना शहर आणि इंदेवाडी ग्रामपंचायत यांच्या बॉर्डरवर असलेला पाण्याची टाकी ते गोकुळधाम रस्ता हा मृत्युचा सापळा बनला आहे. शिवाय इंदेवाडीच्या हद्दीमध्ये असलेल्या खड्डेमय रस्त्यामुळे नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरीकांनी सोमवार दि. 14 जुलै 2025 रोजी दुपारी 2 वाजता जालना – अंबड रोडवर रास्ता रोको आंदोलन केले.
इंदेवाडी पाण्याची टाकी, गोकुळधाम, मातोश्री कॉलनी, संघर्ष नगर, गटविमा गृहनिर्माण संस्था या भागात सुमारे 10 ते 15 हजार कुटुंब राहतात. परंतु, या भागातील नागरीकांना अद्याप नागरी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत. रस्ते, पाणी, विज या सह विविध समस्यांनी नागरीक त्रस्त आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते फकीरा वाघ यांच्या नेतृत्वात सोमवारी जालना ते अंबड रोडवर पाण्याच्या टाकीजळ तिव्र रास्तारोको आंदोलन केले. यावेळी फकीरा वाघ, अॅड. मदन पंडीत, सुरेश मदन, सुधाकर भालेराव, दिलीप अंभोरे, रंजना डोळसे, अंजली खिल्लारे, रेखा आरके, पुष्पाबाई वाघ, अशोक खाडे यांच्यासह शेकडो नागरीकांची उपस्थिती होती.