Saturday, October 25, 2025
Homeऔरंगाबादटी २० चा रणसंग्राम !       

टी २० चा रणसंग्राम !       

टी २० चा रणसंग्राम !
    कालपासून ( ९ सप्टेंबर ) आखातातील दुबई आणि अबुधाबी येथे टी २० क्रिकेटचा रणसंग्राम सुरू झाला आहे. आशिया खंडातील क्रिकेटचा राजा कोण हे ठरवण्यासाठी भारतासह आशिया खंडातील आठ देश एकमेकांना भिडणार आहेत. या स्पर्धेत जो संघ विजयी होईल तो  आशिया चषकावर स्वतःचे नाव कोरणार आहे. आशिया खंडातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पात्रता फेरीत विजय मिळवून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेले हॉंगकॉंग, संयुक्त अरब अमिराती ( युएई ) आणि ओमान या आठ संघात ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना काल  अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात झाला तर आज  भारत आणि संयुक्त अरब अमिराती ( युएई ) यांच्यात लढत रंगणार आहे. वास्तविक आशिया चषकाची पात्रता फेरी याआधीच सुरू झाली असून या  पात्रता फेरीत हॉंगकॉंग, संयुक्त अरब अमिराती ( युएई ) आणि ओमान हे  संघ पात्र ठरले  असून  भारत,  पाकिस्तान यांच्या गटात संयुक्त अरब अमिराती ( युएई  ) आणि ओमान  हे देश समाविष्ट झाले  आहेत.   दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे देश आहेत.  प्रत्येक गटातून दोन संघ असे एकूण चार संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील त्यांच्यात पुन्हा लढत होऊन दोन संघ अंतिम फेरीत पोहचतील. या स्पर्धेत आठ संघ खेळत असले तरी भारत आणि पाकिस्तान या दोन संघांना विजेतेपदासाठी पसंती दिली जात आहे. भारत आणि पाकिस्तान हे या स्पर्धेत प्रबळ दावेदार मानले जात असले तरी तरी श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघही चांगली तयारी करुन मैदानात उतरले आहेत त्यामुळे ही स्पर्धा रंगतदार ठरेल यात शंका नाही. भारतासाठी ही स्पर्धा विशेष महत्वाची आहे कारण मागील तीन पैकी दोन स्पर्धेत ( २०१६ , २०१८, २०२३ ) भारताने विजेतेपद मिळवले आहे. २०२२ साली श्रीलंकेने आशिया चषकावर नाव कोरले होते. भारताने ही स्पर्धा सर्वाधिक आठ वेळा जिंकली असून यावेळी ही स्पर्धा जिंकून भारत आशिया चषकावर नवव्यांदा नाव  कोरेल  का ? याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. भारतीय संघ या स्पर्धेत हॉट फेव्हरेट समजला जातोय कारण भारतीय संघ  या स्पर्धेतील सर्वात संतुलित संघ आहे. भारताचे सर्व खेळाडू अनुभवी असून फॉर्मात आहेत.  डावखुरा युवा धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्मा आणि अनुभवी स्टायलिश फलंदाज  शुभमन गिल यांची सलामीची जोडी प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडली की मधल्या फेरीचे काम हलके होऊ शकते. तिसऱ्या क्रमांकावर युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा  येईल तो सध्या बॅडपॅच मधून जात असला तरी त्याची बॅट कधीही तळपू शकेल. तिलक वर्मा जर फॉर्मात आला तर भारताला या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. चौथ्या क्रमांकावर कर्णधार सुर्यकुमार यादव येईल तो ही सध्या चांगलाच फॉर्मात असून एकहाती सामना जिंकून देण्यात तो पटाईत आहे.  त्याच्यानंतर विकेट किपर आणि स्फोटक फलंदाज संजू सॅमसन येईल.  ज्या दिवशी संजू सॅमसनची  बॅट चालते त्यादिवशी भारत विजयी होतो. त्यानंतर रिंकू सिंग  किंवा शिवम दुबे येतील ते फिनिशरची भूमिका निभावतील. कदाचित जितेश शर्मा यालाही या क्रमांकावर संधी मिळू शकते तो ही चांगला फिनिशर आहे. त्यानंतर अनुभवी हार्दिक पांड्या हा फलंदाजीस येईल. हार्दिक पांड्या हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू संघात असल्याने संघाचे संतुलन वाढले आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा अनुभवी जसप्रीत बुमरा आणि युवा अर्षदीप सिंग तसेच  हर्षित राणा सांभाळतील तर फिरकी गोलंदाजीची धुरा अनुभवी अक्षर पटेल   आणि कुलदीप यादव  यांच्यावर आहे. त्यांना मिस्ट्री फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीची साथ लाभेल. वरुण चक्रवर्ती हा जगातील सध्याचा सर्वात घातक फिरकी गोलंदाज समजला जातो. त्याची फिरकी भल्या भल्या फलंदाजांनाही कळत नाही त्याचा दिवस असला तर प्रतिस्पर्धी फलंदाजांची फळी कोलमडून पडेल. अक्षर पटेल हा फिरकी गोलंदाज फलंदाजीही करतो. म्हणजे तो ही अष्टपैलू खेळाडू आहे. संघात निवड झालेले हे सर्व खेळाडू टी  २० मधील जाणकार खेळाडू आहेत विशेष म्हणजे या खेळाडूंना दुबई आणि अबुधाबीमध्ये  खेळण्याचा चांगला अनुभव आहे.  दुबई आणि अबुधाबी मध्ये भारतीय संघ अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. याच ठिकाणी एकदा आयपीएलही रंगली होती आणि त्यात यातील काही  खेळाडूंनी भाग घेतला होता त्यामुळे तेथील खेळपट्टी आणि हवामानाशी भारतीय खेळाडू परिचित आहेत. त्यामुळे भारतच या स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारताला या स्पर्धेत जर कोणी आव्हान  देऊ शकेल तर तो पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी  लढत होणार  असून या लढतीकडे  संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. नेहमीप्रमाणे भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा हा सामना रंगतदार होईल यात शंका नाही.  ऑपरेशन सिन्दुर नंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आमने सामने येत असल्याने या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अलीकडच्या काळात  पाकिस्तानची कामगिरी चांगली झालेली नाही. त्यांचा माजी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद  रिझवान नावाचा त्यांचा विकेट किपर बॅट्समनला संघातून वगळले आहे फॉर्म हरपल्याने त्यांना संघातून बाहेर वगळण्यात आले आहे.  त्यांच्या संघात  कर्णधारासह अनेक खेळाडू नवखे आहेत. त्यांचा संघ नवखा असला तरी भारताविरुद्ध ते जीव तोडून खेळतात हा त्यांचा इतिहास आहे. पाकिस्तानी संघात नवीन खेळाडू असले तरी त्या संघास कमी लेखण्याची चूक  भारतीय संघ करणार नाही.  भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न ते नेहमीच करत असतात.  त्यांच्याकडे दर्जेदार वेगवान गोलंदाज आहे. भारतीय फलंदाजांना बाद करण्यासाठी ते जीवाचे रान  करतील यात शंका नाही त्यामुळेच हा सामना रंगतदार ठरेल.  या स्पर्धेत भारत पाकिस्तान एकदा नव्हे तर तीनदा आमने सामने येतील अशी शक्यता आहे. १४  सप्टेंबर नंतर सुपर फोर मध्येही हे दोन्ही संघ एकमेकांना भिडतील आणि तिथे चांगली कामगिरी केली तर कदाचित अंतिम फेरीतही दोन्ही संघ समोरासमोर येतील. भारत या स्पर्धेतील प्रबळ दावेदार असला तरी टी २० स्पर्धेत कोण विजयी ठरेल हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही  मात्र  मागील कामगिरीचा आणि सध्या असलेल्या फॉर्मचा विचार करता भारतच या स्पर्धेत अजिंक्य ठरेल आणि  आशिया चषकावर नवव्यांदा नाव कोरेल असा विश्वास १५० कोटी देशवासियांना आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघाला  मनापासून  शुभेच्छा!
-श्याम ठाणेदार दौंड
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments