स्व. किशोर अग्रवाल यांच्या स्मृत्यर्थ
प्लास्टिक संकलनासाठी वाहन भेट
रोटरी क्लब ऑफ जालना रेनबोच्या पर्यावरणपूरक उपक्रमाला बळ
जालना/प्रतिनिधी/ पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकीसाठी सदैव अग्रेसर असलेले युवा उद्योजक राहुल अग्रवाल यांनी वडील स्व. किशोरजी अग्रवाल यांच्या स्मृत्यर्थ रोटरी क्लब ऑफ जालना रेनबोच्या प्लास्टिक संकलन कार्यासाठी आधुनिक ई-वाहन भेट दिले. त्याचा लोकार्पण सोहळा 13 सप्टेंबर रोजी पार पडला.
प्रारंभी रोटरी क्लब ऑफ जालना रेनबोच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा श्रीपत यांनी प्लास्टिक संकलन कार्याची माहिती देऊन, राहुल अग्रवाल यांनी एक वाहन उपलब्ध करून दिल्याने आमच्या प्लास्टिक संकलन व पर्यावरण संवर्धन कार्याला निश्चितच मोठे बळ प्राप्त झाल्याचे सांगून त्यांचे आभार व्यक्त केले. राहुल अग्रवाल म्हणाले की, रोटरी क्लब च्या माध्यमातून प्लास्टिक संकलन आणि पर्यावरण संवर्धनाचे मोठ्या प्रमाणात कार्य होत असून, त्यास हातभार लागावा, हा उद्देश समोर ठेवून उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या या नव्या वाहनामुळे प्लास्टिक संकलन कार्यास गती मिळेल. जालना शहरात प्लास्टिक संकलन आणि पुनर्वापराला चालना मिळून पर्यावरण संवर्धनाचा प्रभाव वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी प्रांतपाल डॉ. सुरेश साबू यांनी स्व. किशोर अग्रवाल यांच्या समाजसेवी कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली अर्पण केली. डॉ. राजेश सेठिया यांनी राहुल अग्रवाल यांनी पर्यावरण क्षेत्रासाठी केलेल्या योगदानाची माहिती दिली.
कार्यक्रमाला सृष्टी फाउंडेशनच्या माजी अध्यक्ष संध्या जहागीरदार, सचिव जयश्री कुंजगे, डॉ. नितीन खंडेलवाल, विवेक मणियार, जयेश पहाडे, डॉ. सुमित्रा गादिया, सौ. स्मिता भक्कड, सुयोग सावजी, जगदीश समदानी, अभय मेहता, संजय राठी, कैलाश बियाणी, संजय दाड, प्रदीप मुथा, अशोक शर्मा, प्रदीप तोतला, विनोद पाटणी यांच्यासह राहुल अग्रवाल यांचा मित्रपरिवार, अद्विक क्लबचे सदस्य तसेच रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार पंकज लड्डा यांनी मानले.