क्त विद्यापीठ सावित्राबाई फुले अध्यासनातर्फे
मालेगाव नाईट कॉलेजमध्ये व्याख्यान संपन्न
महात्मा फुले रात्रशाळेचे प्रवर्तक – डॉ. रामदास भोंग
नाशिक/प्रतिनिधी/ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि आर्ट्स कॉमर्स सायन्स नाईट कॉलेज, मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांचे शिक्षण विषयक कार्य’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. मालेगाव येथील नाईट कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यक्रमास मुक्त विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले अध्यासनाचे प्रमुख डॉ. रामदास भोंग प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. मुक्त विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी श्री. पद्माकर इंगळे होते.
आपल्या व्याख्यानात डॉ. भोंग म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८५५ मध्ये पुण्यात सुरू केलेली कामगार कष्टकऱ्यांसाठीची पहिली रात्र शाळा ही एक शैक्षणिक व सामाजिक क्रांती होती, ज्यामुळे महात्मा फुले हे भारतातील कामगार कष्टकऱ्यांच्या रात्र शाळेचे प्रवर्तक ठरतात. ते पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांनी केवळ मुलींच्या शिक्षणासाठीच नव्हे तर कामगार, शेतमजूर अशा समाजातील सर्व स्तरातील व शेवटचा घटक असलेल्यांची शिक्षणाची सोय केली. याच कार्यामुळे आजही भारतातील कामगार कष्टकऱ्यांना शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्वल करण्याची संधी मिळते. अध्यक्षपदावरून बोलतांना श्री. पद्माकर इंगळे यांनी देखील फुले दाम्पत्य व श्रीमती फातिमा शेख यांच्या कार्याचा गौरव केला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. झुलेखा अन्सारी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तौसीफ खान यांनी केले तर श्रीमती रेहाना अन्सारी यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
