Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादसुरसम्राट कुंदनलाल सैगल

सुरसम्राट कुंदनलाल सैगल

सुरसम्राट कुंदनलाल सैगल

        हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ गायक व पहिले सुपरस्टार कुंदनलाल सैगल यांची आज पुण्यतिथी. कुंदनलाल सैगल यांचा जन्म ११ एप्रिल १९०४ रोजी जम्मू येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील अमरचंद सैगल हे जम्मू काश्मीर संस्थानात मामलेदार होते तर आई केसरबाई या गृहिणी होत्या. त्यांच्या आईला संगीताची खूप आवड होती. धार्मिक कार्यक्रमात त्या भजन, किर्तन गात त्यामुळे लहान वयातच कुंदनलाल सैगल  यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. त्यांच्या आई याच त्यांच्या संगीतातील पहिल्या गुरू होत्या. कुंदनलाल सैगल यांनी संगीत कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले नव्हते पण युसुफ नावाच्या व्यक्तीकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले होते. अर्थजनासाठी त्यांनी टाईपरायटर विक्रेत्याचे काम केले पण संगीतावरील प्रेमापोटी त्यांनी ते काम सोडून छोट्या मोठ्या मैफलीत गायला सुरुवात केली. त्यांच्या गायनाने प्रभावित होऊन बी. एन. सरकार यांनी त्यांना न्यू थिएटर साठी करारबद्ध केले. १९३२ साली त्यांनी चित्रपटात अभिनय करायला सुरुवात केली. पण त्यांचे पहिले तीनही चित्रपट चालले नाही. १९३३ साली आलेला पुरण भगत नावाचा चित्रपट मात्र खूप गाजला. या चित्रपटाने त्यांची गायक आणि नायक म्हणून चित्रपट सृष्टीला ओळख करून दिली. १९३५ साली आलेल्या देवदास या चित्रपटाने त्यांना सुपरस्टार बनवले. या चित्रपटात त्यांनी गायलेली सर्व गाणी गाजली. या चित्रपटातील त्यांचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. दीदी, साथी, सूरदास, तानसेन, जीवनमृत्यू हे त्यांचे चित्रपटही खूप गाजले. १९४६ साली प्रदर्शित झालेला शारजहाँ हा चित्रपट देखील खूप गाजला. १९४७ साली आलेला परवाना हा चित्रपट त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला. हा चित्रपट देखील यशस्वी झाला.  एक बंगला बने न्यारा…, करू क्या आस निरास भाई…, सो जा राजकुमारी सो जा…, बाबुल मोरा…., जब दिल ही तूट गया… ही त्यांनी गायलेली गाणी अजरामर झाली. आजही ही गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. कुंदनलाल सैगल यांच्या गायनाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या गायनातील उत्स्फूर्तता आणि सहजता, आर्त दर्दभरा आवाज आणि प्रत्येक गाणे भावपूर्णतेने गाण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली त्यामुळे त्यांची गाणी रसिकांच्या मनाला भिडत. कुंदनलाल सैगल यांनी भजन, किर्तन, ठुमरी, गझल, अंगाई गीत, बाल गीत, विरह गीत अशी सर्व प्रकारची गाणी गायली. हिंदी सोबतच त्यांनी उर्दु, बंगाली, तामिळ या भाषेतील चित्रपटातही  भूमिका केल्या. त्यांनी ३६ चित्रपटात भूमिका केल्या तर १८५ गाणी गायली. मुकेश, मोहम्मद रफी या महान गायकांवर सुरवातीच्या काळात सैगल यांच्याच गायन शैलीचा प्रभाव होता. हे महान गायक सैगल यांनाच आपला आदर्श मानत. १८ जानेवारी १९४७ रोजी कुंदनलाल सैगल यांचे निधन झाले. कुंदनलाल सैगल यांचे निधन होऊन आज ७९ वर्ष झाली तरीही त्यांच्या गायनाची मोहिनी आजही कायम आहे. आजही त्यांची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. कुंदनलाल सैगल हे खऱ्या अर्थाने भारताचे सुरसम्राट आहेत. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
-श्याम ठाणेदार 
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments