अभिनय आणि नृत्य यांचा सुंदर मिलाफ अभिनेत्री संध्या
आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वृद्धापकाळाने ४ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली. अभिनेत्री संध्या म्हणजे अभिनय आणि नृत्य यांचा सुंदर मिलाफ. २७ सप्टेंबर १९३२ रोजी जन्मलेल्या अभिनेत्री संध्या यांचे पूर्ण नाव विजया श्रीधर देशमुख असे होते. त्यांचे वडील रंगभूमीवरील कलाकार होते. त्यामुळे अभिनेत्री संध्या यादेखील रंगभूमीवर काम करू लागल्या. त्यांच्या मोठ्या भगिनी वत्सला या देखील रंगभूमीवर काम करत असत. अभिनेत्री संध्या यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती त्यामुळे त्या नृत्याचे देखील कार्यक्रम करत असत. याच नृत्याने त्यांना चित्रपट सृष्टीत प्रवेश मिळवून दिला. दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी अमर भूपाळी या चित्रपटासाठी अभिनेत्री संध्या यांची निवड केली कारण हा चित्रपट तमाशाप्रधान होता. यातील मुख्य नायिका ही तमासगिरीन होती. सहकाजीकच नायिकेला नृत्य कौशल्याची जाण असणे गरजेचे होते. अभिनेत्री संध्या यांच्याकडे नृत्य कौशल्याची चांगली जाण असल्याने त्यांची या चित्रपटासाठी निवड झाली. या चित्रपटातील तमासगिरणीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री संध्या यांनी खूप कष्ट आणि नृत्याचे धडे गिरवले. त्यांच्या या कष्टाचे चीज झाले. हा चित्रपट खूप गाजला. यातील गाणीही खूप गाजली. त्यानंतर त्यांना परछाई या हिंदी चित्रपटात खलनायिकेची भूमिका मिळाली या चित्रपटात त्यांनी संध्या हे नाव धारण केले पुढे हेच नाव रूढ झाले. झनक झनक पायल बाजे या संगीतप्रधान चित्रपटातही त्यांनी मुख्य नायिकेची भूमिका साकारली. या भूमिकेने त्यांना अनेक चित्रपट मिळवून दिले. तीन बत्ती चार रास्ता, दो आँखें बाराह हात, नवरंग यासारखे त्यांनी अभिनय केलेले चित्रपट देखील हिट झाले. नवरंग या चित्रपटातील जा रे जा नटखट…. या गाण्यात त्यांनी पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही भूमिका निभावल्या. त्यानंतर त्यांनी स्त्री, सेहरा, लडकी सह्याद्री की, जल बन मछली नृत्य बिन मजली हे त्यांचे चित्रपट देखील गाजले. अभिनेत्री संध्या यांचा सर्वाधिक गाजलेला आणि लक्षात राहिलेला चित्रपट म्हणजे पिंजरा. या चित्रपटात त्यांनी साकारलेली नायिका अजूनही रसिकांच्या मनात घर करून आहे. अभिनय सम्राट निळू फुले, डॉ श्रीराम लागू यांच्यासारखे दिग्गज कलावंत असतानाही अभिनेत्री संध्या यांची भूमिका रसिकांच्या लक्षात राहिली. या चित्रपटातील सर्व गाणी गाजली. या चित्रपटाने त्याकाळी विक्रम केला होता. चंदनाची चोळी अंग अंग जाळी हा त्यांचा शेवटचा चित्रपट. हा चित्रपटही गाजला. त्यानंतर मात्र त्यांनी मनोरंजन विश्वातून निवृत्ती स्वीकारली. अभिनेत्री संध्या यांनी राजकमल चित्रपट संस्थेखेरीज इतर कोणत्याही चित्रपट संस्थेच्या चित्रपटात काम केले नाही. शेवटपर्यंत त्या राजकमल आणि व्ही शांताराम यांच्याशी एकनिष्ठ राहिल्या. त्यांनी व्ही शांताराम यांच्याशी विवाह केला. व्ही शांताराम यांच्या त्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र सरकारने त्यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने गौरविले. अभिनय आणि नृत्य यांचा सुंदर मिलाफ असलेल्या अभिनेत्री संध्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
-श्याम ठाणेदार